
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, आज घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचे मंगलमय वातावरणात आगमन होत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. विघ्नहर्त्या भगवान गणेशाला समर्पित असलेला हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा, उत्साह आणि समृद्धी घेऊन येवो तसेच देशाच्या निरंतर प्रगतीला बळ मिळो, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदी यांनी केली.
गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरील ‘एक्स’ या व्यासपीठावर विशेष संदेश प्रसिद्ध करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, सर्व देशबांधवांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. विघ्नहर्त्या गणरायाच्या दर्शनाचा आणि पूजेचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह निर्माण करो. भगवान गणेशाच्या दैवी आशीर्वादाने सर्व कार्ये यशस्वी होवोत आणि राष्ट्र निरंतर प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत राहो, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशासोबत भगवान श्री विनायकाला वंदन करणारा संस्कृत श्लोकही प्रसिद्ध केला.
मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावतंसकं विलासिलोकरक्षकम्।
अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं
नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम्॥
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, 'मी भगवान श्री विनायकाला वंदन करतो, ज्यांचे पवित्र हात मोदकांनी सुशोभित आहेत, जे साधकांना सदैव मुक्तीच्या मार्गावर मार्गदर्शन करतात, ज्यांच्या कपाळावर चंद्रकोर शोभून दिसते, जे संपूर्ण विश्वाचे रक्षक आणि ब्रह्मांडात एकमेव सर्वोच्च स्वामी आहेत. ज्यांनी गजासुर राक्षसाचा वध केला आणि जे आपल्या भक्तांना सर्व दुःखे व संकटांतून त्वरित मुक्त करतात.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील भाविक आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विघ्नहर्ता आणि शुभ कार्यांचे प्रणेते भगवान श्री गणेश यांच्या पूजेचा हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मांगल्य घेऊन येवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. गणपती बाप्पाच्या कृपेने सर्व अडथळे दूर व्हावेत, प्रत्येक संकल्प पूर्ण व्हावा आणि नागरिकांचे जीवन आनंदाने भरून जावे, अशा शुभेच्छा त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशातून दिल्या.
गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. बुद्धी, समृद्धी आणि नव्या कार्याचा प्रारंभ यांची देवता म्हणून गणेशाची पूजा केली जाते. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभी गणेशाचे आवाहन करण्याची परंपरा आहे. संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असून, घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. सजावट, धार्मिक विधी, आरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पुढील काही दिवस राज्यभर उत्साहाचे वातावरण राहणार आहे.
यंदा गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी साजरी होत असून, त्यानिमित्त गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका काढून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule