माणगावच्या बाजारपेठेत पोलिसांचा 'रूट मार्च'; बेशिस्त पार्किंगवर थेट बडगा
रायगड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व माणगाव पोल
Police conduct 'route march' in Mangaon market; strict action against haphazard parking.


रायगड, 14 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या थेट नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर धडक रूट मार्च काढला. हा रूट मार्च माणगाव एसटी स्थानकाजवळील वाहतूक पोलीस चौकीपासून सुरू होऊन मुख्य बाजारपेठ, मोर्बा रोड कॉर्नर, शेलार नाका आणि कचेरी रोडमार्गे माणगाव पोलीस ठाण्यात समाप्त झाला.

हा रूट मार्च केवळ औपचारिक संचलनापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाईचा ठरला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी संपूर्ण मार्गावर पायी फिरून वाहतूक व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. बाजारपेठेत रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांचे व मार्किंगचे उल्लंघन करून वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना तात्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यामुळे रस्ता लगेचच मोकळा झाला.

कचेरी रोड परिसरात मनमानी पद्धतीने बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या दुचाकींवर पोलिसांनी कोणतीही दयामाया न दाखवता थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी उसळत असल्याने एका छोट्या चुकीच्या पार्किंगमुळेही संपूर्ण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. नागरिकांची सुरक्षितता, सुरळीत दळणवळण आणि शहरातील शिस्त यांना सर्वोच्च प्राधान्य देत, रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही बेशिस्तीची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम या रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande