
लातूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पैलवान जालिंदर भाऊ जाधव यांच्या आदेशानुसार गाव, वाडी व तांड्यांमध्ये शाखा स्थापन करून समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याच अनुषंगाने खंडाळी येथे टायगर ग्रुपच्या शाखेची स्थापना करण्यात आली. मराठवाडा अध्यक्ष पैलवान उमेश भाऊ पोखरकर, जिल्हाध्यक्ष करणसिंग घयरवाल व तालुकाध्यक्ष पैलवान भागवत दादा पाटील यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष पैलवान भागवत दादा पाटील यांनी टायगर ग्रुपचे वाघ म्हणून ओळखले जाणारे अभिजीत साळुंखे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. “अभिजीत साळुंखे यांच्या निधनामुळे टायगर ग्रुपचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे भाऊ शिवदास सोळंके यांनी खंडाळी येथे शाखेच्या उद्घाटनासाठी आम्हाला बोलावून घेतले आणि ही शाखा स्थापन करण्यात आली,” असे त्यांनी सांगितले.
टायगर ग्रुपच्या माध्यमातून तालुक्यातील गाव, वाडी व तांड्यांपर्यंत शाखांचे जाळे पोहोचविण्यात येत आहे. या शाखांच्या माध्यमातून गावातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पदाधिकारी गावपातळीवर सक्रियपणे काम करणार आहेत. गावातील वीज, पाणी किंवा अन्य कोणताही प्रश्न असो, तसेच एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवला असेल, तर त्या वेळी टायगर ग्रुपचे पदाधिकारी स्वतःहून पुढे येऊन मदत करतील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जात-पात व भेदभाव न पाळता “आपण सर्व एकच आहोत, एकजुटीने समाजसेवा करायची आहे,” या भावनेतून टायगर ग्रुप अहमदपूर तालुक्यात समाजसेवेचे कार्य करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis