पश्चिम बंगाल पोटनिवडणुक: ममता बॅनर्जींनी दोन उमेदवार उतरवले रिंगणात
ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार ममता बॅनर्जी १५ वर्षांत प्रथमच विधानसभेबाहेर नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नाहीत. राज्यातील नंदिग्राम आणि रेजीनगर या दोन विधानस
West Bengal By election Mamata Banerjee Fields Two Candidates


ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार ममता बॅनर्जी १५ वर्षांत प्रथमच विधानसभेबाहेर

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नाहीत. राज्यातील नंदिग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांत ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. नंदिग्राममधून संचिता प्रधान (डे), तर रेजीनगरमधून रबीउल आलम चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी नंदिग्राम विधानसभा मतदारसंघाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्याचप्रमाणे आम जनता उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायून कबीर यांनी राजीनामा दिल्यानंतर रेजीनगरची जागा रिक्त झाली होती.

ममता बॅनर्जी यांनी २०११ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून त्या आमदार झाल्या होत्या. त्यापूर्वी त्या लोकसभेच्या खासदार होत्या. गेल्या १५ वर्षांत प्रथमच ममता बॅनर्जी विधानसभेबाहेर राहणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

नंदिग्राम हा तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय संघर्षाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. २००७ मधील भूसंपादनविरोधी आंदोलनामुळे नंदिग्रामचे नाव राज्याच्या राजकारणात चर्चेत आले. या आंदोलनाचा तृणमूल काँग्रेसला मोठा राजकीय फायदा झाला आणि २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष सत्तेवर आला. २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून शुभेंदू अधिकारी यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शुभेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जी यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बनले.

२०२६ च्या विधानसभा निवडणुकीत शुभेंदू अधिकारी यांनी नंदिग्रामसह भवानीपूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. भवानीपूरमध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी भवानीपूरची जागा कायम ठेवत नंदिग्रामच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे नंदिग्राममध्ये पोटनिवडणूक होत आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सत्तेतून बाहेर पडल्यानंतर तृणमूल काँग्रेससमोर संघटनात्मक आव्हान उभे राहिले आहे. ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटांमध्ये पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह आणि निधीवरून संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला असून निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंची चर्चा केली आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आयोगाकडून निर्णय न झाल्यास ऋतब्रत गट उमेदवारी अर्जाची मुदत संपल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

देशातील 4 राज्यांमध्ये पोटनिवडणुका

तामिळनाडूतील दोन जागा: मदुरंतकम आणि धारापुरम - मरगथम कुमारवेल आणि पी. सत्यबामा यांच्या राजीनाम्यामुळे या दोन विधानसभा जागा रिक्त झाल्या. दोन्ही जागांसाठी अंतिम मतदार याद्या २३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या.

पुदुचेरीमधील थट्टानचावडी जागा: एन. रंगस्वामी यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली. या जागेची मतदार यादी १४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली.

पश्चिम बंगालमधील रेजीनगर-नंदिग्राम जागा: हुमायून कबीर यांच्या राजीनाम्यामुळे रेजीनगरची जागा आणि सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे नंदिग्रामची जागा रिक्त झाली. या जागांसाठी अंतिम मतदार याद्या २८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या.

आसाममधील नागाव लोकसभा जागा: प्रद्युत बोरदोलोई यांच्या राजीनाम्यामुळे आसाममधील नागाव लोकसभा जागा रिक्त झाली. या जागेची अंतिम मतदार यादी १० फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande