
पाणी, तेल आणि रसायनाच्या मिश्रणातून कृत्रिम दूध तयार केल्याचा संशय
पुणे, १४ सप्टेंबर (हिं.स.) : गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक प्रकार समोर आला आहे. राज्यात प्रथमच दुधाच्या नमुन्यात ‘अल्फॉक्स-२००’ (Alphox-200) या औद्योगिक रसायनाचा वापर करून भेसळ केल्याचे आढळून आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सार्वजनिक प्रयोगशाळेतील सूत्रांनी दिली आहे.
दुधामध्ये यापूर्वी प्रामुख्याने डिटर्जंट किंवा युरियाची भेसळ केल्याचे प्रकार समोर आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या दुधाच्या तपासणीत अल्फॉक्स-२०० हे रसायन आढळून आल्याचे प्रयोगशाळेतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दुधातील भेसळीचा हा नवा प्रकार आरोग्याच्या दृष्टीने गंभीर मानला जात आहे.
प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ‘अल्फॉक्स’ हे प्रामुख्याने कापड उद्योग, चर्म उद्योग तसेच औद्योगिक डिटर्जंटमध्ये वापरले जाणारे रासायनिक द्रव आहे. पाणी आणि तेल एकत्र ठेवण्याचा त्याचा गुणधर्म असल्याने त्याचा गैरवापर दुधाच्या भेसळीसाठी केला जात असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाणी, तेल आणि अल्फॉक्स यांचे मिश्रण करून पांढरेशुभ्र दिसणारे कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर बाजारातील दुधाच्या नमुन्यांची तपासणी अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु