
सोलापूर, 14 सप्टेंबर (हिं.स.)।
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण महसूल प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले आहे. १२ आणि १३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील दुष्काळी गावांची पाहणी करत शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगोला आणि माळशिरस तालुक्यांतील गावांना भेटी देऊन पीकस्थितीचा आढावा घेतला.याच अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी आज उत्तर सोलापूर आणि मंगळवेढा तालुक्यांतील दुष्काळी गावांना भेटी देत पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी जाणून घेतल्या.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे येथे त्यांनी सोयाबीन, उडीद आणि तूर पिकांची पाहणी केली. पाण्याअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. शेतकऱ्यांशी संवाद साधताना शासनाकडे प्रस्ताव पाठवून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन निऱ्हाळी यांनी दिले.भोगाव येथे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यात आली.
यावेळी सोलापूर शहर उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील आणि तालुका कृषी अधिकारी माळी उपस्थित होते.
देगाव येथे मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. माचनूर येथे ई-पीक पाहणी तसेच कांदा पिकाची स्थिती जाणून घेण्यात आली.त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे पावसाअभावी पीक न घेतलेल्या चालू पड जमिनीची पाहणी अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी केली.जिल्ह्यातील विविध भागांतील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण आणि नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन शासनाकडे आवश्यक प्रस्ताव पाठविण्याच्या दृष्टीने महसूल प्रशासनाकडून ही पाहणी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड