
धुळे , 15 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने कोरडवाहू पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. कापूस, ज्वारी, बाजरी, मका आदी पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, दुसरीकडे काही भागांत कापसावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आधीच पावसाअभावी संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकांची मोठी चिंता लागली आहे. सुरुवातीच्या काळात पिकांची वाढ समाधानकारक झाली होती; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने कोरडवाहू पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांची पाने पिवळी पडत असून, काही पिके करपू लागली आहेत. पावसाचा खंड पडल्याने काही भागांतील कापूस पिकांवर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे झाडांवर ताण निर्माण होत असून, त्याचा परिणाम कापसाच्या वाढीवर होत आहे. काही ठिकाणी कापसाची पाने लालसर होऊन पिकाची स्थिती खालावत असल्याचे चित्र आहे. कापसावरील रोगामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाची आवश्यकता असताना पावसाचा खंड आणि त्यात रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने विहिरींच्या पाणीपातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे काही ठिकाणी विहिरींवर आधारित पिकांनाही पाण्याच्या नियोजनाचा फटका बसत आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पुढील काळात दमदार पाऊस न झाल्यास कापूस पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाच्या आगमनाकडे लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर