‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; ३९व्या दिवशीही ८ कोटींची कमाई
मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार घोडदौड कायम ठेवली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ३९ दिवस झाले असतानाही त्याच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही. विशेष म्हणजे सहाव्या सोमवारीही या चित्रपटाने तब्बल ८.२५
Hanuman Ansh Continues Strong Box Office Run Earns 8 Crore Day 39


मुंबई, 15 सप्टेंबर (हिं.स.)। ‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली दमदार घोडदौड कायम ठेवली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ३९ दिवस झाले असतानाही त्याच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही. विशेष म्हणजे सहाव्या सोमवारीही या चित्रपटाने तब्बल ८.२५ कोटी रुपयांची भारतातील निव्वळ कमाई केली आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रदर्शनानंतर सुरुवातीला अत्यंत संथ कमाई केली होती. पहिल्या १५ दिवसांत चित्रपटाची दैनंदिन कमाई ५० लाख रुपयांच्या खालीच होती. काही दिवस तर कमाई अवघी ५ लाख रुपयांपर्यंत घसरली होती. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईने अचानक वेग घेतला आणि आता हा चित्रपट ५० दिवसांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांच्या ‘हनुमान अंश’ने सहाव्या सोमवारी ९ हजार १९८ शोमधून ८.२५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण निव्वळ कमाई २२२.८८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर जगभरातील एकूण कमाई २७९.८० कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी ‘धुरंधर २’ने २ हजार ८०८ शोमधून केवळ १.०५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे ‘हनुमान अंश’ने ‘धुरंधर २’पेक्षा जवळपास सात पट अधिक कमाई केली आहे.

‘हनुमान अंश’ने केवळ ‘धुरंधर २’लाच मागे टाकले नाही, तर ‘हैवान’ आणि ‘मिर्झापूर : द मूव्ही’पेक्षाही सोमवारी अधिक कमाई केली. ‘हैवान’ने चौथ्या दिवशी ३ हजार २६५ शोमधून अवघी ७० लाख रुपयांची कमाई केली. तर ‘मिर्झापूर : द मूव्ही’ने ७ हजार १४ शोमधून ५.५० कोटी रुपये कमावले. या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत ‘हनुमान अंश’ची कामगिरी निश्चितच लक्षवेधी ठरली आहे.

७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘हनुमान अंश’मध्ये शोभिनव सत्य, विहान शेडगे, चंदन के. आनंद, पूर्णिमा तिवारी, अनिल रस्तोगी आणि गुलशन पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. विशाल बावा यांनी छायाचित्रण, तर शंख राजाध्यक्ष यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. कमी सुरुवातीनंतरही दीर्घकाळ प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यात ‘हनुमान अंश’ यशस्वी ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande