बाप्पाच्या आठवणी आणि परंपरांमध्ये रंगलेला कलाकारांचा गणेशोत्सव
मुंबई , 15 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि आपुलकी घेऊन येणारा सण आहे. बाप्पाचं घरी आगमन, आरती, मोदक, सजावट, कुटुंबीयांसोबतचे क्षण आणि बाप्पाच्या दर्शनातून मिळणारं समाधान, या सगळ्यांमधून प्रत्येकाच्या मनात या स
बाप्पाच्या आठवणी आणि परंपरांमध्ये रंगलेला कलाकारांचा गणेशोत्सव


मुंबई , 15 सप्टेंबर (हिं.स.)।गणेशोत्सव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि आपुलकी घेऊन येणारा सण आहे. बाप्पाचं घरी आगमन, आरती, मोदक, सजावट, कुटुंबीयांसोबतचे क्षण आणि बाप्पाच्या दर्शनातून मिळणारं समाधान, या सगळ्यांमधून प्रत्येकाच्या मनात या सणाच्या अनेक खास आठवणी जपलेल्या असतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त झी मराठीच्या कलाकारांनी त्यांच्या घरातील गणेशोत्सवाच्या तयारीपासून ते बाप्पासोबतच्या खास आठवणी आणि अनुभवांपर्यंत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. कुणासाठी बाप्पाचं घरात आगमन हा सर्वात आनंदाचा क्षण आहे, तर कुणासाठी लहानपणीच्या आठवणी आणि वर्षानुवर्षे जपलेल्या परंपरा खास आहेत. तर काही कलाकारांसाठी बाप्पासोबतचं नातं हे श्रद्धा आणि विश्वासाचं आहे.

विजया बाबर म्हणजेच ‘कमळी’ ने सांगितले - यंदाही आम्ही खूप जोशात तयारी करतोय. माझी ताई, जीजू, दादा, वहिनी, मी आणि फॅमिली मेंबर्स असा आमचा फॅमिली ग्रुप आहे. त्यात डेकोरेशन, बाप्पाच्या मूर्तीचं सिलेक्शन अशा अनेक विषयांवर आमच्या चर्चा आणि आयडिया सुरू असतात. आमच्याकडे गणेशोत्सव खूप छान आणि अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. गणेशोत्सव म्हटलं की रात्रभर जागून केलेलं डेकोरेशन मला खूप खास फीलिंग देतं. आधी कितीही ठरवलेलं असलं तरी आदल्या रात्री जे होतं, तेच फायनल डेकोरेशन असतं. त्यासोबतच गौरी आगमन ही माझ्यासाठी खूप स्पेशल गोष्ट असते. गौरी आगमन आणि गौरीचं जेवण या दोन गोष्टींची मी वर्षभर आतुरतेने वाट बघत असते. गौरी आगमन आदल्या दिवशीपासूनच सुरू झालेलं असतं. छान वाजत-गाजत, ताट वाजवत आम्ही गौरीचं आगमन करतो. रात्री गौरीला दागिने घालण्यापासून ते सजवण्यापर्यंत खूप सुंदर माहोल असतो. कितीही काहीही झालं तरी गणपतीच्या पहिल्या दिवशी, गौरी आगमन आणि गौरीच्या जेवणाच्या दिवशी माझी सुट्टी कन्फर्म असतेच. म्हणजे जगातली कुठलीही सुट्टी माझी कॅन्सल झाली तरी मला चालते, पण या सुट्ट्या मी कधीच कॅन्सल करत नाही.

गौरीच्या जेवणाच्या दिवशी आमच्याकडे प्रॉपर पुरणपोळीचं जेवण असतं. कटाची आमटी, भात, भजी, गोडधोड असं सगळं नैवेद्य दाखवलं जातं आणि रात्री मग आम्ही गौरी-गणपती जागवतो. छान मंगळागौरीचे खेळ खेळतो. मंगळागौरीचे खेळ खेळून झाल्यावर आपली इच्छा देवीच्या कानात सांगायची असते. अशी प्रथा आहे आणि आम्ही अजूनही ही प्रथा पार पाडतो. गौरी जागरणाच्या दिवशी आई शेवटचं जे गाणं गाते, ज्यात देवीला लेक म्हणून संबोधलं जातं आणि तिची सासरी परत पाठवणी केली जाते, त्या वेळी आम्ही सगळेच खूप इमोशनल झालेलो असतो. माझ्या अंगावर आताही सांगताना काटा येतोय.

अदिती सारंगधर म्हणजेच ‘सनई चौघडे’ मालिकेतील तेजस्विनी खानोलकर म्हणाली - मी गर्भवती असताना असं ठरवलं होतं की बाळ झाल्यानंतर एक वर्ष गणपती बाप्पांना आपण घरी आणूया. मुलगा झाल्यानंतर आम्ही खूप आनंदात आणि उत्साहात गणपती आणला. अगदी साधंच डेकोरेशन केलं होतं, पण खूप लोक दर्शनाला आले होते आणि जेवणाचीही बेत ठेवला होता. छान तयार व्हायचं, लोकांचं अगत्य करायचं, हा आनंद इतका जास्त होता की एक वर्ष म्हणता म्हणता तब्बल सात वर्षं आम्ही गणपती बाप्पाची आराधना केली. दिवसातून आमच्याकडे ५०-६० लोकांचा राबता असायचा. बाप्पाला नैवेद्य चढवण्याचा, आपल्या हातचं बनवून लोकांना जेवायला देण्याचा, त्यांचं अगत्य करण्याचा आणि आरती म्हणतानाचं ते मंगलमय वातावरण अनुभवण्याचा आनंद काही वेगळाच होता.

सात वर्षांनंतर, आम्ही आमच्या गणपती बाप्पाचं उद्यापन केलं. यंदाचा गणेशोत्सव तसा आमच्याकडे नाही, पण मित्र-मैत्रिणींकडे गणपती असतात, त्यांच्याकडे दर्शनाला जाते. त्यात छान नटूनथटून बाप्पाचं मोहक रूप पाहायला मला खूप आवडतं. मला माझा एक अनुभव आवर्जून सांगायचा आहे. जेव्हा माझ्याकडे गणपतीचं आगमन करत नव्हतो, तेव्हा निलू ताईंसोबत एका प्रोजेक्टवर काम करत होते, तेव्हा नाना पाटेकरांच्या घरी, दोन-तीन वर्षं मी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यांच्या बाप्पाकडे बघताच मला रडू यायला लागलं. असं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलं होतं. वाटत होतं बाप्पा डोळ्यात डोळे घालून आपल्याशी संवाद साधतोय आणि सांगतोय, ‘सगळं ठीक आहे, जे काही चाललंय ते मला समजत आहे, सगळं छान होईल.’ मी माझ्या सगळ्या भावना त्यांच्या समोर मोकळ्या केल्या. तेव्हा मला इतकं समाधान वाटलं की बाप्पा मला समजून घेतोय. तेव्हापासून बाप्पाशी एक वेगळं नातं निर्माण झालं.

मुलगा झाल्यापासून आणि त्याला कळायला लागल्यापासून, साधारण गेल्या दीड-दोन वर्षांपासून आम्ही सगळी मंडळी एकत्र जमतो. मग गणपती बाप्पाची माती आणतो, मुलांना जमेल तसा, आपल्याला जमेल तसा छोटासा बाप्पा बनवतो, त्याला रंगवतो आणि सोसायटीमध्ये खाली त्याची १०-११ दिवस स्थापना करतो. त्यामुळे मुलांनासुद्धा गणेशोत्सवाचं महत्त्व कळतं. टिळकांचा जो हेतू होता सार्वजनिक गणेशोत्सवामागे, सर्व जणांसाठी उपलब्ध असलेला, सर्वांनी मिळून केलेला सर्वांचा बाप्पा, असा विचार आम्ही आमच्या बिल्डिंगमधल्या लोकांमध्ये आणि आमच्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतोय.

गणपती बाप्पा म्हटलं की उकडीचे मोदक आठवतात. वर्षभर आपण डाएट केलेलं असतं, पण मोदक समोर आला, त्याची अशी पातळ पारी दिसायला लागली की आतलं सारण आपल्याला खुणावायला लागतं. त्यावर तुपाची धार सोडायची आणि तो तुपात भिजलेला मोदक खाताना तो तोंडात कधी विरघळून जातो ते कळत नाही. बाप्पा म्हटलं की मोदक, बाप्पा म्हटलं की जास्वंदीचं लाल फूल, बाप्पा म्हटलं की छान आरास आणि भरपूर आरत्या. मला आठवतं, लहानपणी माझ्या मावशी-आजीच्या माणिक कॉलनीतल्या चाळीतल्या घरात गणपती आणायचे. तिथे आरतीच्या वेळेस खूप धमाल असायची. एका घरातून दुसऱ्या घरात, दुसऱ्या घरातून तिसऱ्या घरात, अशी अनेक चाळीतली घरं आरत्या करून संपवायची. त्या आरत्या, घंटानादासोबत मोठमोठ्याने ढोल वाजवून एकदम व्यवस्थित व्हायच्या. प्रत्येक घरातल्या प्रसादानेच पोट भरलेलं असायचं. आमच्या ढगे आजीकडचा तो असा एक गणपती मला आवर्जून आठवतो.

निखिल दामले म्हणजेच ऋषी म्हणाला, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्याकडे पुण्याला गणेशोत्सव साजरा होणार आहे. आम्ही मुळात गणपतीची मूर्ती आणत नाही. आमच्या घरातच एक चांदीची मूर्ती आहे, तिचंच आम्ही दरवर्षी पूजन करतो आणि यावर्षीही तेच करणार आहोत. मी या उत्सवात सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची वाट बघत असतो, ते म्हणजे माझ्या आईच्या हातचे उकडीचे मोदक. कधी एकदा पुण्याला जाऊन मोदक खाईन, याची मी उत्सुकतेने वाट बघतोय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात, ही गोष्ट मला खूप आवडते. हल्लीच्या धावपळीमुळे आणि शूटिंगमुळे भेटी होत नाहीत, पण गणेशोत्सवाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. गप्पा, पत्ते खेळणं आणि मजा-मस्ती अशा गोष्टींमध्ये आमचा गणेशोत्सव छान रंगतो. लहानपणीची एक आठवण म्हणजे, माझे बाबा मला वेगवेगळ्या गल्लीतले आणि वेगवेगळ्या मंडळांचे गणपती दाखवायला घेऊन जायचे, तेही मला खांद्यावर बसवून. गावात, गल्लीतून, गर्दीतून वाट काढत आम्ही बाप्पांच्या मूर्तींचं दर्शन घ्यायचो. त्यानंतर मी कॉलेजमध्ये असताना एका जिवंत देखाव्यात सहभागी झालो होतो. आम्ही मित्रांनी मिळून एका मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पोवाडा सादर केला होता. अलका टॉकीजच्या इथे एका चौकामध्ये विसर्जनाच्या दिवशी आम्ही तो पोवाडा सादर केला होता. ही एक खूप छान आठवण आहे माझी. मी खरंच खूप उत्सुक आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होईल आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

गणेशोत्सवाच्या आठवणी, घरातील परंपरा, कुटुंबीयांसोबतचे आनंदाचे क्षण आणि बाप्पावरची श्रद्धा यामुळे प्रत्येक कलाकाराचा गणेशोत्सवाचा अनुभव वेगळा आहे. यंदाही हे कलाकार आपल्या खास आठवणी आणि परंपरांसोबत गणरायाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande