
रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । जिल्ह्यात काल मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. काही भक्तांनी आज दीड दिवसाने मूर्तीचे विसर्जन केले. जिल्ह्यातील सुमारे १४ हजार गणपतींचे आज विसर्जन झाले.
गणेशोत्सवामुळे जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच खासगी आस्थापनांना सुटी असल्याने बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणरायाच्या आगमनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली.
सायंकाळच्या सुमारास बाजारात पूजेसाठी लागणाऱ्या भाज्या, तांदूळ, पिठे, फळभाज्या तसेच नैवेद्यासाठी केळीची पाने, हळदीची पाने आणि अळूची पाने खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती.
दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनामुळे आज विविध ठिकाणी भक्तिमय वातावरण आहे. जवळचे पाणवठे, नद्या, समुद्रावर विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात येणार आहे. आज केवळ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. आता पाचव्या दिवसापासून घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू होईल.
दरम्यान, विसर्जनामुळे आजपासून अनेक चाकरमान्यांनी आरक्षित तसेच अनारक्षित रेल्वेगाड्या, एसटी आणि खासगी बसेसने परतीचा प्रवास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी