इराणच्या हल्ल्यांनी अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांचे मोठे नुकसान; अहवाल समोर
वॉशिंग्टन , 15 सप्टेंबर (हिं.स.)।पेंटागॉनच्या वॉचडॉगने इराणसोबतच्या संघर्षादरम्यान मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी उपकरणांचे आणि तळांचे झालेल्या नुकसानीचा पहिला अधिकृत तपशील जाहीर केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या महानिरीक्षकांनी २८ फेब्रु
इराणच्या हल्ल्यांनी अमेरिकेच्या मध्य पूर्वेतील लष्करी तळांचे मोठे नुकसान; अहवाल समोर


वॉशिंग्टन , 15 सप्टेंबर (हिं.स.)।पेंटागॉनच्या वॉचडॉगने इराणसोबतच्या संघर्षादरम्यान मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी उपकरणांचे आणि तळांचे झालेल्या नुकसानीचा पहिला अधिकृत तपशील जाहीर केला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या महानिरीक्षकांनी २८ फेब्रुवारी ते ३० जून या कालावधीसाठी तयार केलेल्या या अहवालानुसार, इराणच्या हल्ल्यांमध्ये कुवेत, बहरीन, कतार, संयुक्त अरब अमिराती (यूएई), सौदी अरेबिया, इराक, ओमान आणि जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरील शेकडो इमारती आणि इतर संरचनांचे नुकसान झाले किंवा त्या नष्ट झाल्या.

या हल्ल्यांमुळे यूएस सेंट्रल कमांडला आपले कर्मचारी, लष्करी साधनसामग्री आणि साठवणूक सुविधा इतर ठिकाणी हलवण्यास भाग पाडले. परिणामी, इराक आणि कुवेतमधून लष्करी वैद्यकीय हेलिकॉप्टरही माघारी बोलावावी लागली आणि जखमींना रस्तेमार्गे स्थानिक रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. अहवालानुसार, बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या प्रादेशिक केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने लष्करी कारवाया सुरू ठेवणे आणि नव्या सुविधा उभारणे यासमोर मोठी आव्हाने निर्माण झाली. अमेरिकेचे कार्यवाहक नौदल सचिव हंग काओ यांनीही अलीकडेच इराणच्या हल्ल्यांमुळे या केंद्राचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले होते.

या विध्वंसामुळे हिंद महासागरातील डिएगो गार्सिया बेटाचा सागरी रसद केंद्र म्हणून वापर करावा लागला. या धोरणात्मक बदलामुळे अमेरिकन लष्कराच्या पुरवठा चक्राचा कालावधी १४ दिवसांवरून १८ दिवसांपर्यंत वाढला.पुरवठ्यातील कमतरता आणि लष्करी टपाल व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे फारसच्या आखातात तैनात असलेल्या अमेरिकन नौसैनिकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभाग आणि यूएसएआयडीच्या महानिरीक्षक कार्यालयांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या या अहवालात इराणच्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या राजनैतिक संकुलांचे सुमारे १८.४ कोटी डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मार्चच्या सुरुवातीला इराणच्या दोन ड्रोननी रियाधमधील अमेरिकन दूतावासाच्या संकुलावर हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआयएच्या स्थानकासह मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.याशिवाय, दुबईतील ड्रोन हल्ल्यात वाणिज्य दूतावासाच्या एका इमारतीचे नुकसान झाले. तर कुवेतमधील अमेरिकन दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथील कामकाज अनेक महिने बंद ठेवावे लागले.

इराकमध्येही अमेरिकेच्या लष्करी तळांवर ६०० हून अधिक हल्ले झाल्याची नोंद झाली असून, त्यामुळे एकट्या इराकमध्ये सुमारे १५.७ कोटी डॉलरचे मोठे नुकसान झाले. सततच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली असुरक्षितता लक्षात घेता, २३ फेब्रुवारी ते ३० जून या कालावधीत सुमारे ३,५०० राजनैतिक कर्मचाऱ्यांना या क्षेत्राबाहेर राहावे लागले. बहरीन, इराक, जॉर्डन, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये कार्यरत असलेल्या गैर-आपत्कालीन कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना अनिवार्यपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, आता हळूहळू काही राजनैतिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे या भागात परतणे सुरू झाले असून, मर्यादित स्वरूपात कामकाजही सुरू करण्यात आले आहे. हा सविस्तर अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा अमेरिकेचे लष्करी आणि गुप्तचर अधिकारी युद्धानंतर मध्य पूर्वेत अमेरिकन कर्मचारी आणि लष्करी साधनसामग्रीची करण्यात आलेली मोठ्या प्रमाणातील कपात कायमस्वरूपी करावी का, याबाबत गांभीर्याने विचार करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande