सौदी अरेबियावर हुतींचा क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला; १३ जखमी, सात घरांचे मोठे नुकसान
रियाध, 15 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील संघर्ष सोमवारी पुन्हा एकदा भीषण वळणावर पोहोचला. इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील अनेक शहरांना लक्ष्य करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला.या हल्ल्यात १३ जण जखमी झाले असून, किमान सात निवा
सौदी अरेबियावर हुतींचा क्षेपणास्त्र-ड्रोन हल्ला; १३ जखमी, सात घरांचे मोठे नुकसान


रियाध, 15 सप्टेंबर (हिं.स.)।येमेनमधील संघर्ष सोमवारी पुन्हा एकदा भीषण वळणावर पोहोचला. इराणसमर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील अनेक शहरांना लक्ष्य करत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला.या हल्ल्यात १३ जण जखमी झाले असून, किमान सात निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे.

सौदी नेतृत्वाखालील लष्करी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या घटनेला दुजोरा दिला. हुती बंडखोरांनी खमिस मुशैत, अब्हा आणि तैफ यांसारख्या प्रमुख शहरांना लक्ष्य केल्याचे त्यांनी सांगितले.खमिस मुशैत येथील लष्करी विमानतळावर डझनभर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. विमानांचे हँगर, रडार यंत्रणा, धावपट्टी आणि दारुगोळ्याचे साठे हे या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य होते.

हल्ल्यानंतर सौदी अधिकाऱ्यांनी देशाच्या दक्षिणेकडील भागात तातडीचा इशारा जारी केला. प्रत्युत्तरादाखल सौदी आणि येमेनच्या हवाई दलानेही हुतींच्या ठिकाणांवर हवाई हल्ले तीव्र केले आहेत. लाल समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या मोचा बंदराच्या आसपासच्या भागात जोरदार बॉम्बफेक करण्यात आली.

दरम्यान, हुती बंडखोरांनी येमेनच्या पश्चिम किनारपट्टीवर तसेच लाल समुद्राच्या प्रवेशद्वाराजवळील पेरिम बेटावर आपले नियंत्रण प्रस्थापित करत स्थिती अधिक मजबूत केली आहे.या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आखाती देश आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबत होणारी महत्त्वपूर्ण चर्चाही पुढे ढकलण्यात आली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सने हा सागरी मार्ग आपल्या पूर्ण नियंत्रणात असून तो बंद असल्याचा दावा केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande