शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटला; दोन मजुरांचा मृत्यू
जळगाव,, 15 सप्टेंबर (हिं.स.)जामनेर-पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पोला भीषण अपघात झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. वाहनाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. या
अपघाताचा प्रतिकात्मक फोटो


जळगाव,, 15 सप्टेंबर (हिं.स.)जामनेर-पहूर मार्गावर शेंदुर्णीजवळ शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या ४०७ टेम्पोला भीषण अपघात झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. वाहनाचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात पोषण आहाराच्या गोण्यांवर बसलेले दोन मजूर वाहनातून बाहेर फेकले गेले. गंभीर दुखापतीमुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) यांचा समावेश आहे.

शालेय पोषण आहार पाचोरा येथून ४०७ वाहनातून पुढे नेला जात होता. वाहतुकीदरम्यान दोन्ही मजूर वाहनातील पोषण आहाराच्या गोण्यांवर बसले होते. शेंदुर्णीजवळ अचानक टायर फुटल्याने वाहन पलटी झाले आणि दोन्ही मजूर बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर शालेय पोषण आहाराच्या वाहतुकीच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मालवाहू वाहनात मजुरांना गोण्यांवर बसवून नेणे नियमांनुसार योग्य होते का ? वाहनाची माल व प्रवासी वाहून नेण्याची क्षमता किती होती ? वाहनाचे फिटनेस, परमिट आणि विम्याची कागदपत्रे वैध होती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

तसेच, पाचोरा येथून निघालेला पोषण आहार नेमक्या कोणत्या केंद्रासाठी जात होता आणि या वाहतुकीचे कंत्राट कोणाकडे होते, याचीही चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघात नेमका कशामुळे झाला, तसेच वाहतुकीदरम्यान कोणत्या नियमांचे पालन झाले होते, याचा तपास सुरू आहे. केवळ टायर फुटल्यामुळे अपघात झाला, यापुरते प्रकरण मर्यादित न ठेवता संपूर्ण वाहतूक प्रक्रियेची चौकशी करून नियमभंगास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande