गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेमुळे नाराजी
रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । काल सुरू झालेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात रेल्वेने आलेल्या चाकरमान्यांनी गणपती विशेष रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या
गणेशोत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेमुळे नाराजी


रत्नागिरी, 15 सप्टेंबर (हिं.स.) । काल सुरू झालेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात रेल्वेने आलेल्या चाकरमान्यांनी गणपती विशेष रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या चालवल्या जात असल्या, तरी अनेक डब्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. अस्वच्छ शौचालये, वॉश बेसिन आणि डब्यांमधील दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कोकणात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांमधील अस्वच्छतेचे व्हिडीओ प्रवाशांकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. विशेष रेल्वेगाड्यांमधील फाटलेल्या सीट, घाणीने भरलेली शौचालये आणि स्वच्छतेअभावी खराब झालेली वॉश बेसिनची अवस्था या व्हिडीओमधून समोर आली आहे. या परिस्थितीवर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाने तातडीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा रेल्वे प्रशासनाने ३८६ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालविल्या आहेत. याच गाड्या आता परतीसाठी निघू लागल्या आहेत. त्यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड या मार्गावर चार अतिरिक्त विशेष फेऱ्याही चालविण्यात आल्या.

गणेशोत्सवासाठी रेल्वेने प्रवास करण्यासाठी सुमारे अडीच लाखांहून अधिक प्रवाशांनी आरक्षण केले. प्रत्यक्षात आरक्षणाव्यतिरिक्तही मोठ्या संख्येने प्रवाशांनी रेल्वेचा वापर केला. अशा परिस्थितीत डब्यांमधील स्वच्छतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला.

नियमित गाड्यांमध्येही अस्वच्छतेच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या. विशेषतः कोकणकन्या एक्स्प्रेस आणि तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर तसेच सर्वसाधारण डब्यांमधील शौचालय आणि वॉश बेसिनच्या स्थितीबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी शौचालयांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचेही सांगण्यात आले. या दोन्ही गाड्यांना मोठ्या प्रमाणावर प्रवासी मिळत असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.

विशेष रेल्वेगाड्यांची अवस्था याहूनही चिंताजनक असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अनेक विशेष गाड्यांना जुन्या डब्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे फाटलेल्या आसनांपासून ते अस्वच्छ शौचालये आणि दुर्गंधीयुक्त डब्यांपर्यंत विविध समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागला.

परतीच्या प्रवासातही अशीच गैरसोय सहन करावी लागेल की काय, अशी प्रवाशांची भावना आहे. प्रत्येक फेरीपूर्वी डब्यांची स्वच्छता सुनिश्चित करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande