
नवी दिल्ली , 16 सप्टेंबर (हिं.स.)। लंडनमधील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘द शार्ड’च्या बाहेर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते जमा झाले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
कार्यक्रम रद्द झाल्याने अनेक चाहते निराश झाले. त्यापैकी काही जण अनेक तासांपासून रांगेत उभे होते. मुख्यमंत्र्यांच्या टीममधील एका सदस्याने लाउडस्पीकरवरून घोषणा केली, “लोकांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हा कार्यक्रम रद्द करत आहोत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला कार्यक्रमासाठी परवानगी मिळालेली नाही.”
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास केलेल्या विजय यांच्या हॉटेलबाहेर अनेक तासांपासून प्रतीक्षा करणाऱ्या एका तरुण चाहत्याने सांगितले, “मला वाटते की हा निर्णय योग्य आहे; मात्र हे सर्व लोक इतका वेळ वाट पाहत होते. तमिळनाडूमध्ये विजय यांच्यासाठी दिसणाऱ्या गर्दीसारखी ही गर्दी नव्हती. विजय तमिळनाडूमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी येथे आले आहेत.”
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात शिष्टमंडळाने अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून, याद्वारे राज्यात सुमारे १२ हजार ३०० कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक येणार आहे. या करारांमुळे तमिळनाडूला आशियातील एक प्रमुख प्रगत उत्पादन आणि तंत्रज्ञान केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल, तसंच ९ हजार ४०० हून अधिक उच्च-मूल्य नोकऱ्या निर्माण होऊ शकतात, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विजय आपला युके दौरा संपवून बुधवारी भारतात परतणे अपेक्षित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode