
नवी दिल्ली, १६ सप्टेंबर (हिं.स.) ईडीने पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. ईडीच्या कोलकाता प्रादेशिक कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अमृत ग्रुप कंपन्यांचे संचालक आणि प्रवर्तक यांच्या कोलकाता आणि इंदूरमधील १७ निवासी आणि कार्यालयीन जागांवर शोधमोहीम राबवून जप्तीची कारवाई केली. दरम्यान, ईडीने मंगळवारी रात्री अमित गांगुलीला जमीन बळकावणे, बनावटगिरी आणि जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक केली.
ईडीच्या म्हणण्यानुसार, अमृत ग्रुप कंपन्या आणि त्यांच्या संचालकांनी विविध ठेव योजनांअंतर्गत जनतेकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण कथितरित्या तो परतावा परत केला गेला नाही. या प्रकरणात, के.सी. दुजारी, काली किशोर बागची आणि ग्रुपशी संबंधित इतर संचालक आणि प्रवर्तकांच्या जागांवर शोधमोहीम आणि जप्तीची कारवाई सुरू आहे. कोलकाता आणि इंदूरमधील एकूण १७ निवासी आणि कार्यालयीन ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात, ईडीने अमित गांगुलीला जमीन बळकावणे, कागदपत्रे आणि जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करणे, तसेच मुखत्यारपत्राशी संबंधित अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली आहे. ईडीच्या तपासानुसार, गांगुलीने विविध व्यक्ती आणि संस्थांच्या मालमत्तांवर बेकायदेशीर मार्गांनी ताबा मिळवला होता.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या पद्धतींमध्ये बनावट संचालक मंडळाच्या ठरावांचा वापर, बनावट सह्यांसह विक्री करार तयार करणे, बनावट कागदपत्रे आणि दस्तऐवज तयार करणे, जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार करणे आणि खोट्या किंवा फसव्या दाव्यांवर आधारित दिवाणी खटले दाखल करणे यांचा समावेश आहे. तपास यंत्रणेने असा आरोप केला आहे की, जमीनमालकांचे कायदेशीर हक्क नाकारण्याव्यतिरिक्त, जे लोक आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी पुढे आले, त्यांच्यावर धाक दाखवणे आणि शारीरिक बळाचा वापरही करण्यात आला.
या तपासात पश्चिम बंगाल पोलिसांकडे अमित गांगुलीविरुद्ध दाखल झालेले २३ एफआयआर देखील उघड झाले आहेत. ईडीच्या मते, ही प्रकरणे मालमत्तेचे कथित फसवणूक आणि बेकायदेशीर अधिग्रहण आणि व्यवहारांशी संबंधित आहेत. एजन्सीचे म्हणणे आहे की, ही प्रकरणे मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांचा एक सुसंगत आणि एकसारखा नमुना दर्शवतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे