
- लातूर महानगरपालिकेची धडक कारवाई.
लातूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आज मोठी कारवाई करत हरंगुळ ते धनेगाव रस्त्यावरील मुख्य जलवाहिनीच्या 'एअर व्हॉल्व्ह'वरील तब्बल १५ अनधिकृत नळ जोडण्या (कनेक्शन्स) खंडीत केल्या आहेत. लातूर जिल्हा हद्दीत राबवण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृतपणे पाणी घेणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हवर अनधिकृतपणे कनेक्शन्स घेतल्यामुळे पाणी पुरवठ्यावर आणि दाबावर विपरीत परिणाम होत आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाडयांनी या बेकायदेशीर जोडण्या तात्काळ काढण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत आज, बुधवार दि. १६ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हरंगुळ ते धनेगाव मार्गावर विशेष मोहीम राबविण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाई
या कारवाईचे गांभीर्य लक्षात घेत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी स्वतः या मोहिमेत सहभागी झाले होते. स्वतःआयुक्त राहुल कुलकर्णी,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, कार्यकारी अभियंता गणेश देवणीकर, पाणीपुरवठा अभियंता क्षितीज कटके,प्रवीण चव्हाण, जलील शेख आणि इतर संबंधित कर्मचारी या कारवाई दरम्यान प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणताही अनुचित प्रकार न घडता अत्यंत वेगाने हे सर्व १५ अनधिकृत कनेक्शन्स कायमचे काढण्यात आले.सार्वजनिक जलवाहिनीचे नुकसान करून किंवा एअर व्हॉल्व्हमध्ये फेरफार करून अनधिकृतपणे पाणी घेणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा या मोहिमेच्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis