दिग्रसमध्ये रस्ता तयार होताच जलवाहिनीसाठी काँक्रिट फोडले
यवतमाळ, १७ सप्टेंबर (हिं.स.) : जुने बसस्थानक ते विश्रामगृहादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या रस्त्याखाली असलेल्या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा जलवाहिनीचे योग्य नियोजन आणि देखभाल
जलवाहिनीसाठी नवनिर्मित रोड फोडला पाणीपुरवठ्याचा प्रश्न; दिग्रस पालिकेच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका


यवतमाळ, १७ सप्टेंबर (हिं.स.) : जुने बसस्थानक ते विश्रामगृहादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ अच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या रस्त्याखाली असलेल्या नगरपालिकेच्या पाणीपुरवठा जलवाहिनीचे योग्य नियोजन आणि देखभाल करण्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा फटका आता नव्याने तयार झालेल्या रस्त्याला बसला आहे.

रस्त्याचे काम पूर्ण होऊन अवघा महिनाही उलटत नाही तोच जलवाहिनीवरील नळजोडण्या बंद झाल्याने नागरिकांसमोर पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी नगरपालिकेने रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराकडून नव्याने तयार झालेला काँक्रिटचा रस्ताच फोडून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाचा निधी, कंत्राटदाराचा वेळ आणि नागरिकांची गैरसोय या तिन्हींचा फटका बसत असल्याची चर्चा आहे.

५०० मीटरमध्ये १० ते १२ ठिकाणी गळती

राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्याखाली असलेल्या विविध सेवावाहिन्यांची माहिती घेऊन त्यांचे योग्य नियोजन करणे तसेच पाणीपुरवठा जलवाहिनीची देखभाल करणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र, रस्त्याचे खोदकाम आणि काँक्रिटीकरण सुरू असताना नगरपालिकेचा एकही कर्मचारी नियमितपणे घटनास्थळी उपस्थित राहत नसल्याचे चित्र दिसून आले.

रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागण्याच्या घटना घडल्या. प्रत्येक वेळी कंत्राटदाराकडून नगरपालिका प्रशासनाला माहिती देण्यात येत होती. त्यानंतर पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी येऊन गळती दुरुस्त करीत आणि पुन्हा रस्त्याचे काम सुरू केले जात होते.

मात्र, जलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आल्याने आता नव्याने तयार झालेला रस्ताच फोडण्याची वेळ आली आहे. अवघ्या ५०० मीटरच्या अंतरात १० ते १२ ठिकाणी जलवाहिनीला गळती झाल्याची माहिती आहे. रस्ता तयार होत असतानाच पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी समोर आल्या होत्या. त्यावेळीच जलवाहिनीची कायमस्वरूपी दुरुस्ती केली असती, तर नव्याने तयार झालेला काँक्रिटचा रस्ता फोडण्याची वेळ आली नसती.

समन्वयाच्या अभावामुळे विकासकामांवर प्रश्नचिन्ह

नवनिर्मित रस्ता फोडल्याने शासनाचा निधी वाया जाण्याबरोबरच कंत्राटदाराचा वेळही खर्च होत आहे. त्यातच नागरिकांना पाणीपुरवठ्याचा त्रास आणि वाहतुकीचा अडथळा सहन करावा लागत आहे.

एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते विकसित केले जात असताना दुसऱ्या बाजूला संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. रस्ता तयार होताच तो फोडण्याची वेळ आली, तर भविष्यात या रस्त्याची अवस्था काय होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जलवाहिनीचे योग्य नियोजन न करता रस्त्याचे काम करण्याची घाई का करण्यात आली, याची चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रहदारीलाही अडथळा

विशेष बाब म्हणजे अत्यंत वर्दळीच्या या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू झाल्याने दोन्ही बाजूंच्या वाहतुकीचा भार एकाच रस्त्यावर आला आहे. त्यातच हा रस्ता गेल्या आठ दिवसांपासून फोडून ठेवण्यात आला असून, अद्याप नळजोडणीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande