
सोलापूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांच्या गरजा ओळखून स्थानिकांनी पर्यटनपूरक व्यवसाय आणि विविध सेवा-सुविधा निर्माण कराव्यात. भाविकांना व्यवसायाच्या माध्यमातून दिलेली सेवाही स्वामींची सेवा समजून प्रामाणिकपणे कार्य केल्यास अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
लोकमंगल परिवार आणि पर्यटन संचालनालय, प्रादेशिक पर्यटन कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथील सर्जेराव सभागृहात पर्यटन क्षेत्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने व्यावसायिक कर्ज मार्गदर्शन व उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार देशमुख बोलत होते.
श्रीक्षेत्र शिर्डीच्या धर्तीवर अक्कलकोटच्या धार्मिक पर्यटनाचा विकास करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. यात्री निवास, भक्तनिवास, होमस्टे, खाद्यपदार्थ, स्थानिक उत्पादने, कृषी पर्यटन तसेच इतर पर्यटनपूरक व्यवसायांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत. महिलांनी या संधींचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे आवाहन देशमुख यांनी केले.
केवळ व्यवसाय सुरू करणे पुरेसे नसून त्याचे प्रभावी ब्रँडिंग, दर्जेदार उत्पादन, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी मार्केटिंग यावरही महिलांनी विशेष भर द्यावा. शासन तसेच लोकमंगल परिवाराच्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
पर्यटन संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे यांनी अक्कलकोट हे देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने धार्मिक पर्यटनासोबतच महिला उद्योजकतेसाठीही येथे मोठ्या संधी असल्याचे सांगितले.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड