
जळगाव जिल्ह्यात १८ ठिकाणी खरेदी केंद्रे; आधारभूत दरही निश्चित
जळगाव, १७ सप्टेंबर (हिं.स.) : खरीप पणन हंगाम २०२६-२७ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेत ज्वारी, मका आणि बाजरी या भरडधान्यांच्या खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत BeaM पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
शासनाने यंदाच्या हंगामासाठी ज्वारी (संकरित) ४ हजार २३ रुपये, मका २ हजार ४१० रुपये आणि बाजरी २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल असे किमान आधारभूत दर निश्चित केले आहेत.
जळगाव जिल्ह्यात शेतमाल खरेदीसाठी अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, पाळधी, एरंडोल, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव येथे खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा आणि पीकपेरा या कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. याशिवाय Agristack वरील Farmer ID नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी System Generated Slip घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी निर्धारित मुदतीत नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संचालक मंत्री संजय सावकारे आणि संचालक संजय पवार यांनी केले आहे. याबाबतची माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
-----------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर