अमरावती : बीएएमएस पदवीधर तरुणाचा झोपेत संशयास्पद मृत्यू
अमरावती, १७ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक येथून नुकतीच बीएएमएसची पदवी पूर्ण केलेल्या २२ वर्षीय तरुण डॉक्टरचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आली आहे. आदित्य रावटे असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती
गोरे होण्याच्या औषधांचा ओव्हरडोस ठरला जीवघेणा?


अमरावती, १७ सप्टेंबर (हिं.स.) : नाशिक येथून नुकतीच बीएएमएसची पदवी पूर्ण केलेल्या २२ वर्षीय तरुण डॉक्टरचा झोपेतच संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आली आहे. आदित्य रावटे असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती आहे. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्यला लहानपणापासूनच फिट अर्थात अपस्माराचा आजार होता. याशिवाय त्वचेचा रंग उजळ करण्यासाठी तो स्वतःवर काही औषधोपचार करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या औषधांचे अतिसेवन किंवा त्यांचा शरीरावर झालेला विपरीत परिणाम मृत्यूशी संबंधित आहे का, याचा तपास केला जात आहे. मात्र, औषधांच्या ओव्हरडोसनेच मृत्यू झाला, असा कोणताही अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून आदित्य आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला होता. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडून पाहिले असता तो उलटा झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या दोन्ही डोळ्यांतून रक्तस्राव झाल्याचे दिसून आल्याने कुटुंबीयांना संशय आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

प्राथमिक शवविच्छेदन अहवालात श्वासावरोध आणि हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आदित्यच्या वैद्यकीय इतिहासात अपस्माराचा आजार असल्याने त्याचा मृत्यू या आजाराशी संबंधित होता का, त्याने घेतलेल्या औषधांचा काही विपरीत परिणाम झाला का किंवा अन्य कोणते कारण होते, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्या खोलीत आढळलेल्या औषधांचे स्वरूप, त्यांचे सेवन किती प्रमाणात झाले होते आणि त्यांचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.मृतदेहाचे व्हिसेरा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, संपूर्ण शवविच्छेदन अहवाल आणि विषविज्ञान तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या औषधांच्या ओव्हरडोसला मृत्यूचे निश्चित कारण मानणे घाईचे ठरणार आहे. वलगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल.

फेअरनेस उत्पादनांमधील पाऱ्याबाबत तज्ज्ञांचा इशारा

दरम्यान, त्वचा उजळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही बोगस किंवा अनियंत्रित फेअरनेस उत्पादनांमध्ये पारा (मर्क्युरी) वापरला जाण्याचा धोका असल्याचे त्वचारोग तज्ज्ञ सांगतात. पारा हा विषारी जड धातू असून त्याच्या संपर्कामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

“त्वचा उजळ करणाऱ्या काही अनियंत्रित फेअरनेस क्रीम्समध्ये त्वचेचा रंग जलदगतीने उजळवण्यासाठी पाऱ्याचा वापर केला जातो. पाऱ्याच्या विषबाधेमुळे किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यातून नेफ्रोटिक सिंड्रोम किंवा किडनीच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते,” अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. पल्लवी मुरके यांनी दिली.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande