गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून वस्त्रसंहिता
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात येत्या १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता बंधनकारक करण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना फलक श्री देव गणपतीपुळे संस्थानातर्फे मंदिर परिसरात लावण्या
गणपतीपुळे


रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात येत्या १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी वस्त्रसंहिता बंधनकारक करण्यात आली आहे.

यासंदर्भातील सूचना फलक श्री देव गणपतीपुळे संस्थानातर्फे मंदिर परिसरात लावण्यात आले असून, वस्त्रसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा अंतिम निर्णय संस्थानने घेतला आहे.

संस्थानकडून यापूर्वीही मंदिर परिसरात वस्त्रसंहितेबाबत जनजागृतीपर सूचना फलक लावण्यात आले होते. आता १ जानेवारी २०२७ पासून या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरा आणि मंदिराच्या धार्मिक वातावरणाला साजेसा पोशाख परिधान करणे भाविकांना आवश्यक राहणार आहे.

मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मंदिर हे सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने समुद्रकिनारी फिरण्यासाठी किंवा पर्यटनासाठी वापरला जाणारा कमी कपड्यांचा पेहराव करून मंदिरात प्रवेश करू नये. गुडघ्याच्या वर येणारे स्कर्ट किंवा ड्रेस तसेच असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्रे असलेले कपडे परिधान करणे टाळावे. अशा प्रकारची वेशभूषा असलेल्या भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दहा वर्षांखालील मुलांना या वस्त्रसंहितेच्या नियमातून सूट देण्यात आली आहे. श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळ्यात येणाऱ्या सर्व भाविकांनी वस्त्रसंहितेची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री देव गणपतीपुळे संस्थानातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande