
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.) नागरिकांच्या सोयीसाठी आणि गरजूंना लाभ देण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदीय कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हे अभियान एक महिनाभर राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, अशा योजना या अभियानात राबविण्यात यावा, तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियानामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यात प्रामुख्याने वन हक्क पट्टे वाटपाचा कार्यक्रम धारणी आणि चिखलदरा तालुक्यात प्राधान्याने राबविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक गावात सभा घेऊन वनपट्टे वाटप निश्चित करावे. त्यानंतर 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कारवाई करावी. ग्रामसभा, उपविभाग आणि जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन या अभियानात पट्टेवाटप अंतिम करण्यात यावे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला सात ई आणि बारा ईबाबत कार्यवाही करण्यात यावी.
अभियानात राशनबाबत कार्यवाही करण्यात यावी. यात लाभार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक नसलेल्या नागरिकांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात यावे. धान्य नको असलेल्या नागरिकांकडून लेखी घ्यावे, तसेच गरजूंची नावे समाविष्ठ करण्यात यावी. तसेच आयुष्मान कार्ड आणि वयोवंदन योजनेत प्राधान्याने कामे करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मेळघाटात प्रामुख्याने ही शिबीरे आयोजित करण्यात येतील. युवकांसाठी 29 सप्टेंबर रोजी सर्व तालुक्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यात 1800 जागा भरण्यात येणार असून यासाठी 56 कंपन्यांनी नोंद केली आहे.
आतापर्यंत 5 हजार युवकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यासोबतच समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात करीअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कामगार विभागातर्फे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर, विमा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बँकेत पगार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. अभियान विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांची जबाबदारीने कार्यक्रमाचे नियोजन करून राबवावे, तसेच याचा अहवाल सादर दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी