डोंबिवलीत गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलन
डोंबिवली, 17 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश देत काटई गावातील समाजसेवक गजानन जयवंत पाटील यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या ११ वर्षांपासून अनोखा उपक्रम राबविला जात आहे. यंदा या उपक्र
Ph01


डोंबिवली, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश देत काटई गावातील समाजसेवक गजानन जयवंत पाटील यांच्या कुटुंबीयांकडून गेल्या ११ वर्षांपासून अनोखा उपक्रम राबविला जात आहे. यंदा या उपक्रमाचे बारावे वर्ष असून घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी पाड्यांमधील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलित केले जात आहे.

बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांकडून शैक्षणिक साहित्य स्वीकारले जाते. तसेच गणपतीच्या मखराच्या सजावटीसाठी वापरण्यात आलेले शैक्षणिक साहित्यही संकलित करून ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. यंदा पाटील यांच्या घरी गणरायाचे १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान सहा दिवसांसाठी आगमन झाले आहे. या काळात भाविकांनी शैक्षणिक साहित्याची मदत करून सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

काटई गावातील कल्याण-शिळफाटा रोडवरील वैभव नगरी परिसरात, साई हॉस्पिटलसमोर असलेल्या अर्जुन हाइट्स बिल्डिंगमधील गजानन जयवंत पाटील यांच्या निवासस्थानी हा उपक्रम राबविला जात आहे.

याबाबत गजानन पाटील म्हणाले की,.उत्सवातून सामाजिक बांधिलकी ही संकल्पना गेल्या ११ वर्षांपासून आपल्या घरी राबविली जात असून यंदा या उपक्रमाने बाराव्या वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे. दरवर्षी गणेशभक्तांकडून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळतो. प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य तसेच बाप्पांच्या मखरातील साहित्य आदिवासी पाड्यांमधील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.

यावेळी पाटील यांनी मराठी शाळांच्या संवर्धनाचा मुद्दाही उपस्थित केला. मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांनी मराठी शाळांच्या अडचणींकडे लक्ष द्यावे.अशी मागणी त्यांनी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरून शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारावी, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande