
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स )। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न सन्मान मिळण्यासाठी गुरुदेव भक्तांचा लढा आता अधिक तीव्र झाला आहे. येत्या २१ ऑक्टोबरपासून गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळ परिसरात भव्य जनआंदोलनाला सुरुवात होणार आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत या आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
जोपर्यंत महाराजांना भारतरत्न जाहीर होत नाही, तोपर्यंत त्यांच्या कर्मभूमीत हा लढा अधिक तीव्रतेने सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार बैठकीत करण्यात आला. या जनआंदोलनाला गती देण्यासाठी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज भारतरत्न सन्मान जनआंदोलन स्थापन करण्यात आले आहे. निमंत्रक म्हणून राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र दासटेकडी आचार्य हरिभाऊजी वेरुळकर (गुरुजी) व प्रार्थना प्रचारक मनोहरराव साबळे, खजिनदार म्हणून विश्वजितबाकडे, तर प्रवक्ते म्हणून प्रशांत कांबळे व शफीक शहा यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
या आंदोलनाचा श्रीगणेशा २८ सप्टेंबर रोजी अमरावती येथून होणार असून संत गाडगेबाबा मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य महारॅली काढली जाईल. यासाठी जिल्हाभरातील गुरुदेव सेवा मंडळ आणि भक्तांच्या भेटीगाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून गावोगावी आंदोलनाचा प्रचार-प्रसार केला जाईल आणि अंतिमतः २१ ऑक्टोबरपासून मोझरी येथील समाधीस्थळावर प्रत्यक्ष जनआंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती प्रवक्ते प्रशांत कांबळे यांनी दिली.
या बैठकीला गुरुकुल संचालक रवी मानव, प्रार्थना प्रचारक मनोहर साबळे, रमेश बोके, मनोज दिगांबरे, विश्वजीत बाकडे, आकाश मकेश्वर, जगन साबळे, शफीक शहा, दिनेश भोंबे, कैलास पुरी, रावसाहेब देवघरे, सुरेश येरणे, मुकुंद पुणसे आणि नरेश भोयर यांच्यासह मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी