
गडचिरोली, १७ सप्टेंबर (हिं.स.) : दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांची स्थिती या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचे पाहणीत समोर आले आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दिपके यांनी गुरुवारी एटापल्ली तालुक्यातील कोसा आलेंगा, कोहका आणि डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या वर्गखोल्या, जीर्ण शाळा इमारती, स्वच्छतागृहाचा अभाव आणि मूलभूत सुविधांबाबतच्या प्रलंबित मागण्या समोर आल्या.
शिक्षक नसल्याने विद्यार्थिनींची जंगलातून पायपीट
कोसा आलेंगा गावात शाळेची इमारत अस्तित्वात असली, तरी तेथे एकही शिक्षक उपलब्ध नसल्याचे पाहणीत आढळले. परिणामी गावातील तीन विद्यार्थिनींना सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील कोहका येथील शाळेत जावे लागते. हा प्रवास जंगलातून पायी करावा लागत असल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिसरात वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा वावर असल्याने सर्पदंश अथवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शाळा गावात असूनही शिक्षकांच्या अनुपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागत असल्याने शिक्षणासोबतच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
२७ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन शिक्षक
कोहका येथील जिल्हा परिषद शाळेत २७ विद्यार्थी असून त्यांच्यासाठी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याचे समोर आले. जागेअभावी पहिली ते चौथीचे वर्ग एकाच खोलीत भरवले जात असल्याची माहिती पाहणीत मिळाली.
दिपके यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोसा आलेंगा येथील बंद शाळेची ग्रामसेवकांकडून साफसफाई करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, शाळा नियमित सुरू करून शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.
डुम्मे शाळेत ५७ विद्यार्थ्यांसाठी दोन वर्गखोल्या
डुम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंत ५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी दोन वर्गखोल्या, दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक कार्यरत असल्याचे पाहणीत आढळले.
वर्गखोल्यांमध्ये पंख्यांची सुविधा नसताना कार्यालयात मात्र पंखा असल्याचे निदर्शनास आले. २०२३ मध्ये शाळेची इमारत जीर्ण झाल्याने ती निर्लेखित करण्याबाबत पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छतागृहाची मागणी प्रलंबित असल्याची माहिती समोर आली.
भेटीच्या एक दिवस आधी नळयोजना
विशेष म्हणजे, दिपके यांच्या शाळा भेटीच्या अवघ्या एक दिवस आधी डुम्मे शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर दिपके यांनी, सुविधा एका दिवसात उपलब्ध करून देता येत असेल, तर यापूर्वी का दिली नाही असा सवाल उपस्थित केला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond