गणेशोत्सवात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.) अचलपूर-परतवाडा जुळ्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी त्याचा फटका गणेशभक्तांना बसला. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे अद्याप बुजविण्यात न आल्याने गणेशमूर्ती घ
गणेशाचे आगमन मात्र  खड्डे कायम गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या भाविकांची कसरत


अमरावती, 17 सप्टेंबर (हिं.स.) अचलपूर-परतवाडा जुळ्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम असतानाच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी त्याचा फटका गणेशभक्तांना बसला. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे अद्याप बुजविण्यात न आल्याने गणेशमूर्ती घरी घेऊन जाताना भाविकांना खड्ड्यांतूनच वाट काढावी लागली.प्रशासनासह लोकप्रतिनिधींनीही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

गणेशोत्सवानिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक आणि मुख्य मार्गांवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. गणेशमूर्ती घेऊन जाणारी वाहने, दुचाकी, चारचाकी तसेच ढोलताशांच्या पथकांमुळे रस्त्यांवरील वर्दळ वाढली होती. अनेक ठिकाणी गणेशमूर्तींच्या मिरवणुका निघाल्याने उत्साहाचे वातावरण होते. मात्र, रस्त्यांवरील खड्डे आणि त्यात साचलेले पावसाचे पाणी मोठा अडथळा ठरत होते. शहरातील अनेक मार्गांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे खोल असून पावसामुळे त्यात पाणी साचल्याने त्यांची खोली अथवा स्थिती वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे लागत आहे. काही ठिकाणी वाहनांचा तोल जाऊन अपघात होता होता बचावल्याचे चित्रही पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande