रत्नागिरी :शेट्ये घराण्यात १५२ वर्षांपासून एकच गणपतीबाप्पा
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । संगमेश्वरमधील शेट्ये कुटुंबात गेल्या १५२ वर्षांपासून एकत्र गणपतीचे पूजन केले जाते. शेट्ये कुटुंबीची बारावी पिढी हा वारसा जपत असून यावर्षी २५ घरांचा एकच बाप्पा विराजमान झाला आहे. सोशल मीडियाच्या युगात माणसे जवळ असू
संगमेश्वरच्या शेट्ये यांच्या घरचा एकत्रित गणेशोत्सव


रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । संगमेश्वरमधील शेट्ये कुटुंबात गेल्या १५२ वर्षांपासून एकत्र गणपतीचे पूजन केले जाते. शेट्ये कुटुंबीची बारावी पिढी हा वारसा जपत असून यावर्षी २५ घरांचा एकच बाप्पा विराजमान झाला आहे.

सोशल मीडियाच्या युगात माणसे जवळ असूनही दुरावत चालली आहेत. विभक्त कुटुंबपद्धती वाढत असताना संगमेश्वरातील शेट्ये कुटुंब गेली १५२ वर्षे एकोप्याची परंपरा जपत आहे. तब्बल २५ घरांना एकत्र आणणारा आणि १२ पिढ्यांनी जपलेला गणेशोत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा होत असून, हा उत्सव एकत्र कुटुंबपद्धतीचा जिवंत आदर्श ठरला आहे. प्रत्येक पिढीने हा वारसा पुढच्या पिढीकडे श्रद्धेने सोपवला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील २५ घरांतील सदस्य एकत्र येतात. वर्षभर कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असलेले कुटुंबीय बाप्पाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येतात. घरात ज्येष्ठांचा आशीर्वाद, महिलांचा उत्साह, तरुणाईची धावपळ आणि चिमुकल्यांचा निरागस आनंद असे चित्र पाहायला मिळते.शेट्ये कुटुंबाच्या गणेशोत्सवातील सर्वात खास आकर्षण म्हणजे महिलांच्या पारंपरिक खेळांची मैफल. झिम्मा-फुगडीच्या फेरांमध्ये महिला रमून जातात आणि जुन्या काळातील गणेशोत्सवाची आठवण ताजी होते. आजच्या आधुनिक मनोरंजनाच्या काळातही या पारंपरिक खेळांना दिले जाणारे महत्त्व विशेष ठरते.आजचा गौरी आगमनाचा दिवस तर या कुटुंबासाठी विशेष उत्साहाचा आहे. रात्री १२ वाजता गौरीची आरती केली जाते. या आरतीसाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येते.

या उत्सवाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ गणपतीची पूजा होत नाही, तर नाती जपली जातात. ज्येष्ठ मंडळी जुन्या आठवणी सांगतात, मधली पिढी परंपरा पुढे नेते आणि तरुणाई त्यात नव्या उत्साहाची भर घालते. चिमुकल्यांना या संस्कारांची ओळख होते. आजच्या काळात ‘कुटुंब एकत्र कसे ठेवावे?’ या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्यांसाठी संगमेश्वरातील शेट्ये कुटुंबाचा गणेशोत्सव एक सुंदर उदाहरण ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande