
नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागामार्फत विशेष तपासणी व कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे व सह आयुक्त (अन्न), नाशिक मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा दिवसांत विभागातील सर्व जिल्ह्यांत करण्यात आलेल्या ३६ कारवायांत एकूण ५ कोटी ४० लाख १६ हजार ६२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित प्रकरणांत १४ तळक कारवाया करण्यात आल्या आहेत.
मे. अरिहंत कोल्ड स्टोरेज, एमआयडीसी, अहिल्यानगर येथून पाश्चराइज्ड कुकिंग बटरचा ७५,३५६.८ किलो साठा (३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये), तर मे. आर्या कोल्ड स्टोरेज अॅण्ड एक्सपोर्टस, कोकणगाव, ता. निफाड, जि. नाशिक येथून फ्रोझन कस्टर्ड अॅप्पल पल्प, मँगो पल्प व क्रिमचा ६,४५७ किलो साठा (३९ लाख १८ हजार ५२० रुपये) जप्त करण्यात आला. दि. ११ सप्टेंबर रोजी द्वारका, नाशिक येथे श्री विजय व बलदेव या दोन खासगी बसमधून २,१५५ किलो स्पेशल स्वीट बर्फीचा ५ लाख ५८ हजार २६७ रुपयांचा साठा जप्त झाला. मे. न्यू वाघ मिल्क डेअरी, पाचोरा येथून क्रिम व तुपाचा ५९३.४ किलो साठा, मे. गायत्री ट्रेडर्स, धुळे येथून गायीचे व म्हशीचे तुप ४६३.४ किलो आणि मे. रुचीराज स्वीट्स, सावेडी, अहिल्यानगर येथून तुपाचा ३०० किलो साठा जप्त करण्यात आला.याशिवाय मे. हिरालाल नंदलाल नवलखा, श्रीरामपूर, ओपेन स्पेस, इच्छादेवी चौक, जळगाव, मे. विजया एंटरप्रायजेस, रविवार कारंजा, नाशिक, मे. प्रकाश एंटरप्रायजेस, पंचवटी, मे. साईरा मुरमुरा ट्रेडर, संगमनेर, मे. अग्रवाल वेफर्स अॅण्ड नमकीन, जळगाव, मे. अंबालाल हिरालाल पटेल, रविवार कारंजा आणि मे.महावीर सुपर मार्केट, जेल रोड, नाशिक येथून विविध खाद्यपदार्थ, खाद्यतेल, तूप, गूळ व मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला.सणासुदीच्या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले, फराळाचे पदार्थ, ड्रायफ्रूट्स आदींची मागणी वाढत असल्याने अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षितता व साठवणुकीबाबत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कडक तपासणी सुरू आहे. नमुने व कागदपत्रांची पडताळणी करून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. भेसळयुक्त अथवा असुरक्षित अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास नागरिकांनी https://complaints.mahafda.in या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI