
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाड्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची खरीपाची पीके वाळून गेली आहेत. एकीकडे दुष्काळसृदश्य परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी आता सरकारच्या निधीकडे, घोषणेकडे आस लावली आहे. आधीच पाऊस ना पाणी, पीकेही वाळून गेली. त्यातच, गुरुवारी दुपारी छ. संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात, सिल्लोड येथील दहिगावात वीज पडून पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली.
जालन्यासह मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊसाची हजेरी पाहायला मिळाली. त्यातच, संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील दहिगाव येथे वादळी पावसादरम्यान शेतातील झोपडीत आसरा घेतलेल्या पती-पत्नीवर काळाचा घाला आला. झोपडीवर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis