
मुंबई, 17 सप्टेंबर (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज २१ वा लोकशाही दिन आयोजित करण्यात आला. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित २१ व्या लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या लोकशाही दिनात अर्जदार श्रीमती रुकसाना बेगम यांनी अर्ज केला. श्रीमती बेगम यांच्या पतीच्या नावे जोगेश्वरी पश्चिम येथील मातेश्वरी गृहनिर्माण संस्थेतील झोपडीच्या बदल्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेअंतर्गत विकासकाकडून पुनर्वसन सदनिका देय होती. मात्र, सदर सदनिकेमध्ये घुसखोरी झाली असून निष्कास्न कार्यवाही करून सदर सदनिका देण्याबाबत श्रीमती रुकसाना बेगम यांनी अर्ज केला होता. सदर अर्जावर 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी शिखर तक्रार निवारण समितीने सदनिका क्रमांक ४१३ व ६०५ यांचे एकत्रित निष्कासन करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सदर प्रकरणी उपजिल्हाधिकारी विशेष घटक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, सक्षम प्राधिकारी व म्हाडा मुंबई मंडळाचे भुव्यवस्थापक व अर्जदार यांच्यासोबत दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर सुनावणी घेणार असल्याचे निर्देश दिले.
तसेच प्रभादेवी येथील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास होऊन देखील श्री. चंद्रकांत चव्हाण यांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा संबधित विकासकाने दिलेला नसून सदर पुनर्वसन सदनिका मिळावी, या मागणीसाठी श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी आजच्या लोकशाही दिनात अर्ज केला. सदर अर्जावर सुनावणी करताना श्री. संजीव जयस्वाल यांनी सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, विकासक व अर्जदार यांना बोलावून दि. २९ सप्टेंबर, २०२६ रोजी विशेष सुनावणी स्वतः घेणार असल्याचे निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी