यवतमाळ : पंतप्रधानांच्या वाढदिवशी शेतकऱ्यांकडून बांधावर प्रतीकात्मक आरती
दुष्काळाच्या सावटाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन यवतमाळ, १७ सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित आणि गंभीर प्रश्ना
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी बळीराजाचा अनोखा आक्रोश! शेतात प्रतिमेसमोर ‘आरती’ ओवाळून प्रतीकात्मक निषेध


दुष्काळाच्या सावटाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन

यवतमाळ, १७ सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन केले. यवतमाळ ग्रामीण शेतकरी चळवळीच्या वतीने तालुक्यातील गोधनी शिवारात कापूस उत्पादक शेतकरी सुभाष मारेकर यांच्या शेतात उभ्या पिकांच्या बांधावरच प्रतीकात्मक आरती करण्यात आली.

राज्य शासनाने पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू केले आहे. मात्र, दुसरीकडे पावसाच्या प्रदीर्घ उघडिपीमुळे यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर यांसारखी पिके पाण्याअभावी करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

या प्रतीकात्मक आरतीप्रसंगी शेतकरी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते प्रा. पंढरी पाठे, सचिन मनवर आणि कृष्णा पुसनाके उपस्थित होते.

“पंतप्रधानांच्या वाढदिवशी उत्सव साजरे होत असताना देशाचा अन्नदाता मात्र शेतात उभ्या पिकांची राखरांगोळी पाहत आहे. सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी आणि प्रशासनाला त्यांच्या अडचणींची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला,” असे प्रा. पंढरी पाठे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, सातबारा कोरा होईपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी चळवळीचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यवतमाळ ग्रामीण शेतकरी चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

-------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande