जळगावच्या २५० अंगणवाड्यांना मिळणार स्मार्ट लूक
जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.)जिल्ह्यातील अंगणवाड्यांना अधिक आधुनिक आणि बालस्नेही बनविण्याच्या उपक्रमाला गती मिळाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये सुमारे २५० अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून, त्यामुळे या केंद्रांमध्य
जळगावच्या २५० अंगणवाड्यांना मिळणार स्मार्ट लूक


जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.)जिल्ह्यातील अंगणवाड्यांना अधिक आधुनिक आणि बालस्नेही बनविण्याच्या उपक्रमाला गती मिळाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत २०२५-२६ मध्ये सुमारे २५० अंगणवाड्यांना स्मार्ट किट देण्यात आले असून, त्यामुळे या केंद्रांमध्ये शिक्षणासोबतच आरोग्य, पोषण आणि बालविकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

या स्मार्ट किटमध्ये बालकांना शिकवण्यासाठी एलईडी टीव्ही किंवा टॅब्लेट, अक्षरओळख व अंकज्ञानासाठी शैक्षणिक साहित्य तसेच बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी विविध खेळण्यांचा समावेश आहे. बालकांच्या संख्येनुसार एका किटसाठी सुमारे ६० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. शिक्षणासोबत आरोग्य-पोषणावरही भर आधुनिक डिजिटल साधनांच्या मदतीने बालकांची वाढ, आरोग्य आणि पोषणस्थितीची नोंद ठेवणे अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील पूर्वप्राथमिक शिक्षण अधिक आनंददायी आणि संवादात्मक करण्यास मदत होत आहे. पहिल्या टप्प्यात निवडलेल्या या २५० अंगणवाड्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि बालसंगोपनाशी संबंधित साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे बालकांना अधिक सुरक्षित आणि आनंददायी वातावरण मिळत आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सध्या ३ हजारांहून अधिक अंगणवाडी केंद्रे असून, पुढील टप्प्यात आणखी अंगणवाड्यांचा विकास करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने माहिती मागवली आहे. जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाकडून ही माहिती सादर करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande