
लातूर, 17 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय कामगिरीबद्दल ‘लातूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दयानंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यासोबतच पोलीस दल अधिक समाजाभिमुख, नागरिकांशी संवाद साधणारे आणि लोकांच्या समस्या जाणून घेणारे बनविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट २०२६ पासून ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, नवीन कायदे, सायबर गुन्हे व फसवणूक, वाहतूक नियम, डायल ११२, दामिनी पथक, शस्त्र कायदा तसेच सुरक्षिततेच्या विविध बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ‘पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर’ हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या आणि आवश्यक कार्यवाही करण्यात आली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि पोलिसांमधील थेट संपर्क वाढण्यास मदत झाली.शहरी भागात ‘पोलीस आपल्या सोसायटीमध्ये’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गृहनिर्माण सोसायट्यांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरातील सुरक्षा, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था तसेच स्थानिक समस्यांची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण आणि त्यातील मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेऊन हेल्मेट वापराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. त्यानंतर १ सप्टेंबर २०२६ पासून संपूर्ण जिल्ह्यात हेल्मेट नियमाच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला. नागरिकांना दंड करणे हा उद्देश नसून दुचाकीस्वारांचे प्राण वाचविणे आणि अपघातांमधील गंभीर दुखापती व मृत्यूचे प्रमाण कमी करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.यासोबतच रक्तदान शिबिरे, सामाजिक संस्थांशी समन्वय, नागरिक जनजागृती आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये पोलीस दलाचा सहभाग वाढविण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच समाजातील विविध घटकांशी संवाद वाढविण्यावर लातूर पोलीस दलाने भर दिला आहे.
पुरस्काराचे श्रेय संपूर्ण पोलीस दलाला
पुरस्कार स्वीकारताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या सन्मानाचे श्रेय संपूर्ण लातूर पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना दिले.
“लातूर भूषण हा माझा वैयक्तिक पुरस्कार नाही. विविध समाजाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबविण्यामागे लातूर पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि अंमलदाराची मेहनत व सहकार्य आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांच्या वतीने स्वीकारत आहे,” असे अमोल तांबे यांनी सांगितले.
समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधत कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिककेंद्री पोलीसिंगला प्राधान्य देणाऱ्या लातूर पोलीस दलाच्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली.या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार शिवाजीराव काळगे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी भारत बाष्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis