
आगामी ११ ऑक्टोबरला गळीत हंगामाचा शुभारंभ
लातूर, १७ सप्टेंबर (हिं.स.) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उभारण्यात आलेल्या संत श्री गोपाळ बुवा महाराज शुगर अँड ॲग्रो फूड इंडस्ट्रीज प्रा. लि. या साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा गुरुवारी (१७ सप्टेंबर) अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यंदा पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम साधेपणाने आयोजित करण्यात आला. येत्या ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात येणार असून, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन राजेश कराड यांनी दिली.
लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर परिसरात उभारण्यात आलेल्या या कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन कारखान्याचे प्रवर्तक तुळशीराम अण्णा कराड, प्रगतिशील शेतकरी काशीरामनाना कराड, कौशल्या कराड, चेअरमन राजेश कराड, शुभांगी कराड, रणविर कराड, देव कराड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यापूर्वी बालासाहेबतात्या कराड आणि आशाताई कराड यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे भागधारक, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना राजेश कराड यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने कारखान्याने १ लाख ३५ हजार टन उसाचे गाळप केले. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, ११ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात करण्यात येणार आहे.यंदाच्या हंगामासाठी उसाला टप्प्यानुसार दर देेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आगामी ११ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यानच्या उसासाठी ३,१५१ रुपये, १ डिसेंबर ते १५ जानेवारीदरम्यानच्या उसासाठी ३,२५१ रुपये, तर १५ जानेवारीनंतर येणाऱ्या उसासाठी ३,३५१ रुपये प्रति टन दर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा दर दोन टप्प्यांत देण्यात येणार असून, पहिली उचल २,८०० रुपये असेल. उर्वरित रक्कम दोन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही कराड यांनी स्पष्ट केले.गाळपासाठी आलेल्या उसाचे पेमेंट विश्वकल्याण नागरी सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात असल्याचे सांगून कराड म्हणाले की, यावर्षी विश्वकल्याण पतसंस्थेच्या माध्यमातून फोन-पे, नगदी रक्कम वितरणासह सुरक्षा ठेव आणि कर्जवाटपाची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी कमी कालावधीत कारखान्याची उभारणी करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने जाहीर केलेल्या दरात निश्चितपणे वाढ होईल; मात्र दर कमी होणार नाही, अशी ग्वाही राजेश कराड यांनी यावेळी दिली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis