नंदुरबारमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिरे
नंदुरबार, १७ सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिर
नंदुरबारमध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिरे


नंदुरबार, १७ सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी दिली.

या विशेष अभियानांतर्गत नागरिकांना नवीन मतदार म्हणून नाव नोंदविणे, मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे तसेच अपात्र किंवा आवश्यकतेनुसार नाव वगळण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नमुना ६, ७ आणि ८ चे अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

१९ ते २७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे

जिल्ह्यातील सर्व संबंधित मतदान केंद्रांवर १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.

शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी अर्ज स्वीकारणे, मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये दुरुस्ती करणे तसेच नाव वगळणीसाठी अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. महिला आणि दिव्यांग नागरिकांच्या समावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

नवमतदारांसाठी संधी

आगामी

१ ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र तरुण नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आगाऊ अर्ज करण्याची सुविधा आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार चार पात्रता तारखांपैकी संबंधित तारखेला १८ वर्षे पूर्ण करणारे पात्र नागरिक मतदार नोंदणीसाठी आगाऊ अर्ज करू शकतात.

नवीन पात्र मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्येही विशेष शिबिरे घेऊन जनजागृती व नोंदणीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नावाची खात्री करण्याचे आवाहन

नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास संबंधित नमुना अर्ज भरून मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी तसेच नोंदणी, दुरुस्ती आणि इतर मतदार सेवा मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत ऑनलाइन सुविधांचाही वापर करता येतो.

पात्र असलेला एकही नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत. नागरिकांनीही या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande