
नाशिक, १७ सप्टेंबर (हिं.स.) : मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या स्वरचित ऑनलाइन राष्ट्रीय हिंदी काव्यवाचन स्पर्धेत मुंबईचे सचिनकुमार झा यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे होत्या. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. जगदीश परदेशी, स्पर्धा संयोजक प्रा. विजय घोरपडे, प्रा. माधुरी मोगल आदी उपस्थित होते.
‘कविता ही सृजनाची प्रक्रिया’
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे म्हणाल्या की, हिंदी भाषेने देशातील विविध संस्कृती, विचार आणि भाषांना एका सूत्रात बांधण्याचे कार्य केले आहे. काव्यवाचन स्पर्धा हा हिंदी साहित्य, समाज, भावना, कल्पना आणि शब्दांचा उत्सव आहे. कवी आपल्या मनातील भावना आणि आवाजाला शब्दरूप देतात. कविता ही सृजनाची प्रक्रिया असून, तिच्या माध्यमातून सामाजिक संदेशही प्रसारित केला जातो.
भारत नव्या युगात प्रवेश करीत असून, या प्रवासात संवेदनशील मन आणि साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील ४४ टक्क्यांपेक्षा अधिक लोक हिंदी बोलतात, असे डॉ. आहिरे यांनी नमूद केले.
हिंदी विभागप्रमुख डॉ. जगदीश परदेशी यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगताना हिंदी ही मोठ्या प्रमाणावर बोलली, लिहिली, वाचली आणि समजली जाणारी भाषा असल्याचे नमूद केले. १४ सप्टेंबर हा हिंदी दिन हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार आणि महत्त्व यांचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरातून १५५ स्पर्धक सहभागी
या ऑनलाइन काव्यवाचन स्पर्धेत दिल्ली, चंदीगड, ओडिशा, मिझोराम, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा आदी राज्यांसह देशभरातून एकूण १५५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. योगेशकुमार होले आणि प्रा. राजेंद्र जाधव यांनी काम पाहिले. प्रा. माधुरी मोगल यांनी सूत्रसंचालन केले.
विजेते स्पर्धक
क्रमांक स्पर्धक पारितोषिक
प्रथम सचिनकुमार झा, मुंबई ₹१,००१ व प्रमाणपत्र
द्वितीय श्वेता जयस्वाल, लखनऊ ₹७०१ व प्रमाणपत्र
तृतीय राममोहन त्रिपाठी, औरेया, ₹५०१ व प्रमाणपत्र
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI