'स्वच्छ नांदेड - सुंदर नांदेड' मोहिमेला सुरुवात
नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड शहराला स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे कचरामुक्त करण्यासाठी आजपासून शहरात ''स्वच्छ नांदेड - सुंदर नांदेड'' ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी य
Q


नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। नांदेड शहराला स्वच्छ, सुंदर आणि पूर्णपणे कचरामुक्त करण्यासाठी आजपासून शहरात 'स्वच्छ नांदेड - सुंदर नांदेड' ही व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील यशस्वी कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या संकल्पनेतून या विशेष 'सेवा संकल्प अभियानाचा' प्रारंभ करण्यात आला.

व्ही.आय.पी. रोडवरील शहीद जवान स्मारक परिसरात एका विशेष कार्यक्रमात या मोहिमेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण, बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री व खासदार मा.श्री. अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे विधानपरिषद आ.अमर राजुरकर, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता महेश कनकदंडे, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणीचे संजय कौडगे, चेतन्यबापू देशमुख, किशोर स्वामी, विविध प्रभागाचे नगरसेवक, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विशेष मोहिमेअंतर्गत केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर शहरातील अंतर्गत गल्ल्या, वस्त्या आणि चौकांची सखोल स्वच्छता केली जाणार आहे. शहराला संपूर्णपणे कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि त्यावरील दुभाजक यांची विशेष स्वच्छता व सार्वजनिक भिंतीची रंगरंगोटी केली जाईल. दुभाजकांवरील झाडांची छाटणी आणि सुशोभीकरण यावरही भर दिला जाणार आहे.

त्याचप्रमाणे शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवण्यात आली आहे. सर्व कार्यालयांना आपापल्या परिसरात स्वच्छता राखून त्याचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आगामी 'श्री' गणेशोत्सव आणि 'दुर्गा देवी' उत्सवाच्या काळात नांदेड शहरात भाविकांची मोठी गर्दी होते. हे लक्षात घेऊन सर्व प्रमुख धार्मिक स्थळे, मंदिर परिसर, विसर्जन मार्ग आणि उत्सव मार्गांवर विशेष २४ तास स्वच्छता मोहीम आणि कचरा उचलण्याची व्यवस्था राबवली जाणार आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, नांदेड शहर हे मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचे शहर असुन नांदेड शहराला महाराष्ट्रातील एक आदर्श आणि सुंदर शहर बनवण्यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

खा.अशोकराव चव्हाण यांनीही नागरिकांना आवाहन केले की, आगामी सण-उत्सवांचे स्वागत आपण स्वच्छ आणि सुंदर नांदेडमध्ये करूया. ही मोहीम केवळ एक दिवसाची नसून, ती लोक चळवळ बनावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, नवयुवक, विद्यार्थी, आणि नागरिकांना या 'स्वच्छ नांदेड - सुंदर नांदेड' मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande