
रत्नागिरी, 17 सप्टेंबर (हिं.स.) । लहानपणीच पोलिओने पाय निकामी झालेल्या तुळसणी (ता. संगमेश्वर) येथील शाकिरा मोहंमद कुरेशी (वय ४५) यांचे पाऊल थांबले, तरी त्यांच्या स्वप्नांची वाटचाल मात्र थांबली नाही. आरएचपी फाउंडेशनच्या मदतीमुळे त्यांच्या आयुष्यात विवाहाने नवे पर्व सुरू झाले आहे.
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तापानंतर डाव्या पायाला पोलिओ झाला. चालता येणे बंद झाले. उपचारासाठी आईसोबत बेळगाव गाठले; मात्र पूर्वीसारखे चालणे शक्य झाले नाही. तरीही परिस्थितीपुढे हार न मानता शिक्षणाची वाट धरत आत्मविश्वासाने आयुष्य जगायला शाकीरा कुरेशी यांनी सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यात काल, दि. १६ सप्टेंबर रोजी एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांचा मुंब्रा (ठाणे) येथील टेलरिंग व्यवसाय करणारे आणि स्वतःही पोलिओमुळे दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले शमशुद्दीन अन्सारी यांच्याशी रत्नागिरीत विवाह झाला.
शाकीरा यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे वडील मोहम्मद कुरेशी वैद्यकीय व्यावसायिक, तर आई सफिया कुरेशी गृहिणी आहेत. त्यांचे दोन भाऊ आणि दोन बहिणी विवाहित आहेत. पोलिओमुळे वाटचाल थांबलेल्या शाकिरा यांची जिद्द कमी झाली नाही. दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तुळसणी येथेच पूर्ण केले. सुरुवातीला वडील सायकलवरून त्यांना शाळेत सोडत आणि परत घेऊन येत. पुढे शाळेत ने-आण करण्यासाठी एका मुलाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण देवरूख येथे रिक्षाने ये-जा करत पूर्ण केले. वयाच्या १७व्या वर्षी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर कॅलिपरच्या साहाय्याने त्यांनी हळूहळू चालण्यास सुरुवात केली. शारीरिक अडचणी असूनही त्यांनी पुढील शिक्षण साखरपा येथून पूर्ण केले आणि पदवीपर्यंत मजल मारली.
पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली आणि परीक्षा दिल्या. त्याच काळात सिंधुदुर्ग येथील काजू प्रशिक्षण केंद्रात त्यांनी सुमारे सहा महिने नोकरी केली. मात्र वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने नोकरी सोडून त्यांना घरी परतावे लागले. त्यानंतर वडिलांचे निधन झाले.
दरम्यान, एका वृत्तपत्रात माहितीच्या आधारे त्या रत्नागिरीतील आरएचपी फाउंडेशनच्या सभासद झाल्या. संस्थेच्या माध्यमातून त्यांना दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना, सुविधा आणि उपक्रमांची माहिती मिळाली. तसेच आवश्यक ती मदतही मिळाली.
अखेर १६ सप्टेंबर २०२६ हा दिवस शाकीरा यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांचा विवाह झाला. आयुष्यातील संघर्ष जवळून अनुभवलेल्या या दोघांनी आता एकमेकांच्या साथीने नव्या आयुष्याची वाटचाल सुरू केली आहे.
त्यांच्या विवाह सोहळ्याला आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, दिव्यांग जनकल्याण संस्था लांजाचे सचिव युसारा पन्हाळेकर, सदस्य शगुफ्ता नाईक आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी