पूस नदी कोरडीठाक; महागाव तालुक्यावर जलसंकटाचे सावट
यंदा पावसात ३२.७१ टक्के घट; प्रकल्पातील पाणीसाठाही ४१.८७ टक्क्यांनी कमी यवतमाळ, १७ सप्टेंबर (हिं.स.) : पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच महागाव तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पूस नदी कोरडीठाक पडल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने मोठ
पूस नदी कोरडीच; महागावावर पाणीटंचाईचे सावटगतवर्षीच्या तुलनेत यंदा २१० मिमी पाऊस कमी; प्रकल्पातील पाणीसाठ्यात घट


यंदा पावसात ३२.७१ टक्के घट; प्रकल्पातील पाणीसाठाही ४१.८७ टक्क्यांनी कमी

यवतमाळ, १७ सप्टेंबर (हिं.स.) : पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच महागाव तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पूस नदी कोरडीठाक पडल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने पूस प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

३ सप्टेंबर २०२५ रोजी पूस प्रकल्पाची जलपातळी ३०५.२१ मीटर, पाणीसाठा ८१.०१ आणि एकूण पर्जन्यमान ६४२ मिमी नोंदविण्यात आले होते. याच तारखेला २०२६ मध्ये जलपातळी ३०५.७ मीटर असली तरी पाणीसाठा केवळ ४७.०९५ आणि एकूण पर्जन्यमान ४३२ मिमी इतके आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २१० मिमी पाऊस कमी झाला आहे. पाणीसाठ्यातही ३३.९१५ इतकी घट झाली आहे. एकूण पर्जन्यमानात ३२.७१ टक्के, तर पाणीसाठ्यात सुमारे ४१.८७ टक्के घट झाली आहे. पाऊस आणि प्रकल्पातील जलसाठा या दोन्हीमध्ये झालेली घट भविष्यातील जलसंकटाची तीव्रता अधोरेखित करणारी आहे.

नळयोजनांवर परिणामाची शक्यता

पूस नदीचा आधार केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. सवना, कलगाव, महागाव, जनुना, करंजखेड, वाघनाथ, हिवरा (संगम), थार, कवठा आणि धनोडा यासह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळयोजनांसाठी ही नदी महत्त्वाचा जलस्रोत आहे.

नदीपात्रातच पाणी शिल्लक राहिले नसल्याने आगामी काळात समाधानकारक पाऊस न झाल्यास या नळयोजनांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्यापूर्वीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूजलपातळीही खालावली

पावसातील खंडामुळे भूजल पुनर्भरणावरही परिणाम झाला असून, तालुक्यातील अनेक विहिरींची पाणीपातळी खोलवर गेल्याचे चित्र आहे. उपलब्ध जलसाठाही दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील काळात विहिरी कोरड्या पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूजलपातळी आणखी खालावल्यास पिण्याचे पाणी, सिंचन आणि घरगुती वापरासाठीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जनावरांसाठीही पाण्याचा प्रश्न

पावसाअभावी शेतीसोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. नदी-नाले, तलाव आणि विहिरींमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात गुराढोरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. त्यामुळे नागरिकांसोबतच मुक्या जनावरांच्या पाण्याचेही योग्य नियोजन करणे आवश्यक ठरणार आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande