
आदिवासीबहुल भागात शासनाच्या योजनांची माहिती आणि सेवांबाबत होणार जनजागृती
नंदुरबार, १७ सप्टेंबर (हिं.स.) : आदिवासी विकास विभाग संचलित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. सेठी आणि प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून चित्ररथाला रवाना केले.
‘सेवा संकल्प अभियान’चा मुख्य उद्देश आदिवासी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, सेवा आणि उपक्रमांची माहिती पोहोचविणे हा आहे. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांसह शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, कौशल्य विकास, रोजगार, महिला व बालकल्याण आणि सामाजिक सुरक्षा यांसह अन्य शासकीय योजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
दुर्गम भागातील नागरिकांना मार्गदर्शन
चित्ररथाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासीबहुल भागांमध्ये जाऊन शासनाच्या योजनांची माहिती, योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया तसेच उपलब्ध शासकीय सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि सेवा प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर