
यवतमाळ 17 सप्टेंबर (हिं.स.)। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला झटका बसला आहे. काँग्रेसचे प्रफुल्ल मानकर, श्रीनिवास नालमवार या दोघांचे अर्ज बाद झाले आहेत. तर युतीच्या उमेदवारांविरोधात असलेले तीन आक्षेप फेटाळण्यात आले आहे. आघाडीला बसलेल्या धक्क्यामुळे खळबळ उडाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २५ जागांसाठी तब्बल ३८१ नामांकन अर्ज दाखल झाले होते. यावरून निवडणूक चांगलीच रंगतदार अवस्थेत पोचल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. १५) सकाळपासूनच सहकार भवन येथे नामनिर्देशन पत्रांच्या छाननीला सुरवात झाली. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसह मतदार आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. छाननी आटोपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्!यांनी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली होती. तद्नंतर तालुका गटांतील उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांवर आक्षेप नोंदविण्यास सुरवात केली.
आक्षेप टाकून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी केला. यात प्रामुख्याने महाविकास आघाडीचे नेते प्रफुल्ल मानकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप टाकण्यात आला होता. या आक्षेपाला निवडणूक निर्णय अधिकार्!यांनी ग्राह्य धरले असून, त्यांचा अर्ज बाद झाला आहे. तसेच शिन्नूअण्णा नालमवार यांचाही अर्ज बाद झाला आहे. महाविकास आघाडीतील दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यात गीता पाटील, सुरेखा ठाकरे, सुनीता ठाकरे, जगदीश सुरजुसे, कुशल ठाकरे यांचेही अर्ज बाद केले. तर अमन गावंडे, प्रकाश देवसरकर आणि वसंतराव घुईखेडकर यांच्या नामांकन अर्जावर दाखल केलेले आक्षेप फेटाळण्यात आले आहेत. एकंदरीत बँकेच्या निवडणुकीतमतदान होण्यापूर्वीच आघाडीला जोरदार धक्का बसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आता नामांकन अर्ज मागे घेण्याकरिता आणखी १४ दिवस शिल्लक आहेत. या काळात आणखी राजकीय हालचालींना अतिशय वेग येण्याची शक्यता आहे. तर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहतील, ही येणारी वेळच सांगेल.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी