
नाशिक, 17 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद आवश्यक आहे. जनसामान्यांच्या सक्रिय सहभागातून ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी केले.
आदिवासी विकास विभागाच्या वतीने गुरुदक्षिणा हॉलमध्ये आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त (प्र.) गोपीचंद कदम, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, सहआयुक्त दिगंबर चव्हाण, आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ, उपायुक्त संतोष ठुबे, विनिता सोनवणे, उपायुक्त शशिकला अहिरराव, महाव्यवस्थापक किरण डांगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.यावेळी दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध व्हावीत आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचा थेट लाभ मिळावा, यासाठी विभागाच्या वतीने ३० विशेष ‘सेवा संकल्प रथ’ पाड्या-पाड्यांवर रवाना करण्यात आले.
मंत्री प्रा. डॉ. वुईके म्हणाले की, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने पालकाच्या भूमिकेतून काम करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी संवेदनशीलतेने कार्य करावे. आदिवासी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या सहा महिन्यांत १२ हजार ५०० अधिसंख्य पदांची विशेष भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. पेसा क्षेत्रातील उर्वरित आठ संवर्गांची पदभरतीही पारदर्शक पद्धतीने करण्यात येणार आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून डीबीटीऐवजी पूर्वीप्रमाणेच थेट भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांशी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला किमान एकदा संवाद साधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नागरिकांकडे उपलब्ध नसलेली आवश्यक शासकीय कागदपत्रे मिळवून देण्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून अभियान यशस्वी करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात ‘सेवा संकल्प रथा’चे अनावरण करण्यात आले. तसेच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना वाहनांचे वाटप आणि ‘एकलव्य कुशल’ योजनेतून रोजगार मिळालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. शेतकरी उत्पादक संस्थांनाही आदेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लाभार्थी, नागरीक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI