
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून हिंगोलीत शासकीय ध्वजारोहणासाठी आलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांना शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांना जाब विचारण्यास निघालेल्या शेकडो शेतकरी आणि पोलिसांमध्ये नांदेड नाका परिसरात जोरदार झटापट झाली. शेतकऱ्यांचा वाढता रोष आणि आक्रमक पवित्रा पाहून पालकमंत्र्यांनी आपला ठरलेला मार्ग बदलत दुसऱ्या रस्त्याने विश्रामगृहाकडे काढता पाय घेतला. या गदारोळामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार होते. मात्र, जमिनी वाचवण्यासाठी हतबल झालेले शेतकरी ध्वजारोहण स्थळाच्या दिशेने निघाले.
पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यासाठी नांदेड नाका भागात मोठे बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, संतप्त शेतकऱ्यांनी हे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांसोबत धक्काबुक्की
आम्हाला पालकमंत्र्यांना भेटू द्या, अशी आर्त विनवणी महिला आणि पुरुष शेतकरी करत होते. पोलिसांनी त्यांना अडवल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी व धक्काबुक्की झाली, ज्यामुळे पोलिसांचीही मोठी दमछाक झाली. शेतकऱ्यांचा हा उद्रेक पाहून पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे टाळले आणि दुसऱ्या पर्यायी मार्गाने शासकीय विश्रामगृह गाठले. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांनी लबाड पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis