
छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : मराठवाड्याला समन्यायी पाणी वाटपाच्या मागणीसाठी मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला.
पार-गोदावरी नदीजोड योजनेअंतर्गत तसेच कोकणातील उल्हास व वैतरणा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांमधील मंजूर 168 टीएमसी आणि तापी व कृष्णा खोऱ्यातील मंजूर पाण्यासह एकूण 240 टीएमसी पाणी अडवून मराठवाड्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त व अवर्षणप्रवण तालुक्यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्याची ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.
तसेच तापी खोऱ्यातील 10.4 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध असतानाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गुजरदरी, सायगव्हाण, कोठी धरण तसेच वैजापूर तालुक्यातील चांदेश्वरी (वाकला) या प्रकल्पांना विविध कारणांमुळे मंजुरी रखडली आहे. हे प्रकल्प तातडीने मंजूर करावेत, अशीही संघर्ष समितीची मागणी आहे.
समन्यायी पाणी वाटपाच्या प्रश्नासंदर्भात विधान परिषदेत लक्षवेधी सूचना तसेच तारांकित प्रश्न उपस्थित करून यापूर्वीही हा मुद्दा मांडल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. शासनस्तरावर संबंधित मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब शिंदे, माजी आमदार विजय गव्हाणे, माजी आमदार जनार्धन तुपे, प्रा. सुशीलाताई मोराळे, दत्तात्रय पाटील, पंडित अण्णा शिंदे यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis