
जळगाव , 17 सप्टेंबर (हिं.स.) । जळगावचा चिमुकला स्केटिंगपटू देवांश प्रविण पाटील याने आपल्या वेगवान आणि दमदार कामगिरीच्या जोरावर स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गोवा येथील पणजीमध्ये नुकतेच झालेल्या नॅशनल मॅचेसमध्ये देवांशने तब्बल तीन पदकांची कमाई करत आपल्या शाळेसह जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
देवांश हा ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड येथे इयत्ता दुसरी (गोदावरी) मध्ये शिक्षण घेत आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत त्याने स्पीड रेसमध्ये तृतीय क्रमांक मिळवत ब्राँझ मेडल, रिले रेसमध्ये प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड ट्रॉफी, तर स्केटॅथलॉनमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले .देवांशच्या या उल्लेखनीय कामगिरीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे त्याची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे देवांशच्या यशाकडे जळगावच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब म्हणून पाहिले जात आहे. लहान वयातच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेची संधी मिळाल्याने देवांशच्या कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देवांशच्या या यशाबद्दल आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवांशचे वडील प्रविण संतोष पाटील, आई प्रियंका प्रविण पाटील, आजी वंदना पाटील, ॲड.अरविंद पाटील, ॲड. सी. आर.पाटील तसेच प्रशिक्षक संजय पाटील उपस्थित होते.ओरियन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्डच्या वतीने प्राचार्य श्रीधर सूनकारी, उपप्राचार्या रजनी गोजेरेकर मॅडम, वर्गशिक्षिका चित्रा पाटील मॅडम आणि स्पोर्ट शिक्षिका प्रमिला बागुल यांनी देवांशचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर