
परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांची जपवणूक करत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला गती देण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण प्रसंगी केले. जिल्हयात पर्जन्यमानात घट झाली असली, तरी शेतकऱ्यांनी संभाव्य टंचाईच्या परिस्थितीला घाबरु नये. शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीत शासन खंबीरपणे पाठीशी असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्यात येतील, असा दिलासाही पालकमंत्री यांनी दिला.
तसेच सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून तळगाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना व सेवा निश्चितपण पोहोचविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणी येथील चक्रवर्ती राजगोपालचारी उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते झाले.
यावेळी ध्वजारोहणास महापौर सय्यद इक्बाल, जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, खासदार संजय जाधव, उपमहापौर गणेश देशमुख, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वीरपत्नी, वीर माता-पिता, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री बोर्डीकर यांनी स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पोलीस पथकाने शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली.
पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तीसंग्राम हा केवळ संस्थानाच्या विलिनीकरणाचा नव्हे तर, प्रादेशिक अखंडता, स्वातंत्र्य व सामाजिक हक्कासाठीचा लढा होता. स्वातंत्र्यसैनिकांच्या या त्यागाची जाणीव ठेवून मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वांनी योगदान देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून महिनाभर जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविणे, जनसहभाग वाढविणे आणि विविध क्षेत्रातील विकासकामांची माहिती या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर पालकमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवान यांच्या वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे वारस आणि उपस्थित नागरिकांची भेट घेऊन मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis