दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – अतुल सावे
नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास,
अ


नांदेड, 17 सप्टेंबर (हिं.स.)। दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा पालकमंत्री अतुल सावे यांनी आढावा घेतला. यावेळी आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, महावितरणचे अधीक्षक अभियंता अजितकुमार खंदारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे, विष्णुपुरीचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. बनसोड, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा आणि नियमित वीजपुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला. पावसाचा खंड तसेच पावसातील अनियमिततेचा सर्वाधिक परिणाम सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पिकांच्या संभाव्य नुकसानीची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्यात येईल, असे पालकमंत्री सावे यांनी सांगितले.

दुष्काळसदृश्य परिस्थितीत संभाव्य उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजना आतापासूनच कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा तसेच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याचाही आढावा घेतला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, पर्जन्यमान, पाणीसाठा, पाणी आराखडा आणि नियमित वीजपुरवठा याबाबतची माहिती पालकमंत्र्यांना दिली. तसेच संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी चारा लागवड, केटीवेअर बंधारे आणि इतर आवश्यक उपाययोजनांचा आढावाही सादर केला.जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित उपाययोजना आणि सद्यस्थितीची माहिती बैठकीत सादर केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande