
परभणी, 17 सप्टेंबर (हिं.स.)। धनगर समाजास अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीचा लढा हा निवडणुकीनंतर सुरू झाला असून येत्या २०२९च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत धनगर समाजाचा आरक्षण आंदोलन लढा ताकदीने सुरूच ठेवणार असून समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देणार, असे प्रतिपादन धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते दीपक बोर्हाडे यांनी केले. ते येथे आयोजित निर्णायक महामोर्चा मेळाव्यात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मंचावर खासदार रामराव वडकुते, भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, विठ्ठलराव रबदडे, मारोतराव बनसोडे, आव्हाड आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. या महामोर्चास संबोधित करताना आंदोलनाचे नेते बोर्हाडे यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, यापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी धनगर समाजास आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे धनगर समाजाने मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान केले. परिणामी केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. आता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वचनाला जागून धनगर समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अन्यथा येत्या निवडणुकीत पक्षाला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला.
दरम्यान, दीपक बोर्हाडे यांनी भरसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शरदराव पवार यांच्या धनगर समाज आरक्षणाच्या संदर्भातील वक्तव्याचे ध्वनीप्रक्षेपण केले. मागील ८० वर्षापासून धनगर समाजास आरक्षण नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. समाजास यापूर्वीच आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजातून हजारो जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर असे हजारो अधिकारी निर्माण झाले असते. आरक्षण मिळवण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे समाजाने सर्व मतभेद विसरून आरक्षण आंदोलनाच्या लढ्यात सर्वशक्तीनिशी एकत्र यावे, आरक्षण आंदोलन मजबूत करावे, या आंदोलनातून समाजाची शक्ती दाखवून देऊन आरक्षणाचा निर्णायक लढा लढावा, असे आवाहन यावेळी आरक्षणाचे नेते दीपक बोर्हाजे यांनी उपस्थित समाजबांधवांना केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis