जीव गेला तरी बेहत्तर, पण सुपीक जमीन देणार नाही; हिंगोलीतील शेतकऱ्यांचा आक्रोश
हिंगोली, 17 सप्टेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी या दोन तालुक्यांतील अत्यंत सुपीक बागायती जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. आम्ही रात्रंदिवस घाम गाळून या जमि
जीव गेला तरी बेहत्तर, पण सुपीक जमीन देणार नाही; हिंगोलीतील शेतकऱ्यांचा आक्रोश


हिंगोली, 17 सप्टेंबर (हिं.स.)।

हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी या दोन तालुक्यांतील अत्यंत सुपीक बागायती जमिनी या महामार्गासाठी संपादित केल्या जात आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. आम्ही रात्रंदिवस घाम गाळून या जमिनी कमावल्या आहेत. आमच्याकडे आधीच कमी शेती आहे, त्यातही शक्तीपीठ महामार्ग घुसवून सरकार आमचा घास का हिरावत आहे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही जमिनीचा एक तुकडाही देणार नाही. जमीन गेली तर आमच्या मुलाबाळांनी काय खायचे? देशाचे नागरिक असूनही आम्हाला स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी पालकमंत्र्यांना भेटू दिले जात नाही, हा कुठला न्याय? असा आक्रोश एका शेतकरी महिलेने व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी बैठक घेण्याचे आणि मोजणी थांबवण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आश्वासन देऊनही प्रशासनाकडून गुप्तपणे जमिनीची मोजणी सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला.

निर्लज्ज पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्या- क्रांतिकारी शेतकरी संघटना

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी राज्य सरकारवर घणाघात केला. हिंगोली जिल्ह्यात सध्या तीव्र दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अशा स्थितीत केवळ दौरे आणि शासकीय कार्यक्रम करत फिरणाऱ्या पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या जळत्या प्रश्नांची आणि संकटांची थोडीही चाड उरलेली नाही. अशा निर्लज्ज पालकमंत्र्यांचा शासनाने तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा येत्या काळात शक्तीपीठ महामार्गाविरोधात यापेक्षाही तीव्र आणि हिंसक आंदोलन छेडले जाईल.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande